किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर संजय राऊतांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. या पार्श्वभूमीवर नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी मुंबई पोलिसांनी संजय राऊतांनी पुराव्यादाखल काहीही दिले नसल्याचा निर्वाळा न्यायालयात दिला. यासंदर्भात माहिती देताना किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“उद्धव ठाकरेंचा त्यांच्याच सरकारवर कंट्रोल नाही”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर किरीट सोमय्यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंचा त्यांच्याच सरकारवर कंट्रोल नाही. त्यांच्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांवरचा विश्वास उडाला आहे. नील सोमय्यांच्या अटकपूर्व जमिनाच्या सुनावणीवेळी मुंबई पोलिसांनी दिलेलं उत्तर उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील आणि संजय राऊतांना एक्स्पोज करणारा आहे. ठाकरेंनी संजय राऊतांच्या माध्यातून नौटंकी चालवली आहे. रोज पत्रकार परिषद घेऊन काहीतरी स्टंट करत आहेत”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे आणि त्यांचे डर्टी डझन. नवाब मलिक गेले, अनिल देशमुख गेले, यशवंत जाधवांकडून जे बाहेर आलंय, त्याच्यातून अर्धा डझन नेते आणि महापालिकेचे अधिकारी संकटात येणार आहेत”, असं देखील किरीट सोमय्या म्हणाले.

“माझे शब्द तुम्ही लिहून ठेवा, या सगळ्यांचे…”, संजय राऊतांचा इशारा; ‘त्या’ साडेतीन नावांविषयीही केलं सूचक विधान!

“पुरावे कोणत्या गटारीत टाकले?”

दरम्यान, संजय राऊतांनी आपल्याविरोधात दिलेले पुरावे मुख्यमंत्र्यांनी कोणत्या गटारीत टाकले? असा खोचक सवाल देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे. “संजय राऊतांनी कोणतीही तक्रार पोलिसांकडे केलेली नाही. संजय राऊतांचे दोन ट्रक भरून पुरावे मुख्यमंत्र्यांनी कुठल्या गटारीत टाकले माहीत नाही. ईडीवाल्याने ७०० कोटी घेतले, २६० कोटी घेतले असे आरोप केले होते. पण एकही कागद मिळाला नाही, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे”, असं सोमय्या म्हणाले.

“मुंबई पोलिसांच्या अहवालातून सरकारचे कपडेच उतरले आहेत. १० दिवस एवढे आरोप केले. ७५०० कोटी गोळा केले, २६० कोटींची ईडीच्या जॉइंट कमिशनरची बेनामी गुंतवणूक, १५ कोटी लाच घेतली. अमित शाह यांना पैसे घेतले. पण एकही कागद नाही. म्हणून आता दुसरं थोतांड. म्हणे पंतप्रधान कार्यालयात पुरावे दिले, मग मुख्यमंत्र्यांना दिलेले पेपर कुठे गेले? राऊत साहेब एवढे प्रचंड घाबरले आहेत, म्हणून रोज वेगवेगळे आरोप करत आहेत”, असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya mocks cm uddhav thackeray sanjay raut allegations on corruption pmw