संजय राऊत यांनी आज राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून ईडीचा गैरवापर करत विरोधकांचा छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात भाजपाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून आता त्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. नुकतीच किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून पुणे पालिकेच्या आवारत धक्काबुक्की करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
लाभार्थी कोण आहेत?
“संजय राऊत साहेबांचा नर्व्हसनेस, (उपराष्ट्रपतींना) पाच पानांचं पत्र, अधिकाऱ्यांना धमक्या हे समजू शकतो. राऊत साहेबांचे एक पार्टनर प्रविण राऊत १ हजार ३७ कोटींच्या पीएमसी बँक घोटाळ्यात जेलमध्ये आहेत. राऊत परिवाराचे दुसरे व्यावसायिक भागीदार सुजीत पारकर यांची १०० कोटींच्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, लाभार्थी कोण आहेत? यांच्या लाभार्थ्यांची ईडी किंवा सीबीआय चौकशी करत असतील, तर राऊतांनी एवढी बोंबाबोंब करायची काय गरज आहे?”, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
“राऊत साहेब, तुमची पत्नी, तुमच्या मुली…”
“संजय राऊत साहेब, तुमची पत्नी, तुमच्या मुली प्रविण राऊत, सुजीत पारकरच्या कंपनीत पार्टनर आहेत. हिशोब तर द्यावा लागेल. धमक्या देऊन चौकशी संपणार नाहीये. अनिल देशमुख जेलमध्ये आहेत, अनिल परब वाट पाहात आहेत. एक राऊत जेलमध्ये आहेत, दुसरे राऊत लाभार्थी सापडले, तर शिक्षा तर होणारच”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.