पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राऊत ईडी कोठडीत होते. दरम्यान, संजय राऊत सध्या कोठडीत असताना भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. वसई विरारमधील २००० कोटी रुपयांचा जमीन बांधकाम घोटाळा, पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथे पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्ससोबत झालेल्या बैठका यांची चौकशी सुरू व्हायची बाकी आहे. त्यामुळे राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
हेही वाचा >>> मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी? मंत्र्यांची यादी फायनल झाली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
“संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिक यांच्या शेजारी होत आहे. आता पत्राचाळ घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. यानंतर वसई विरारमधील २ हजार कोटींचा जमीन बांधकाम घोटाळा, पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथील पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्ससोबत झालेल्या बैठका तसेच चीन यात्रा याची चौकशी होणार आहे. त्यामुळे या घोटाळ्यांची चौकशी होईपर्यंत राऊतांचा मुक्काम लांबणार असे वाटत आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपामध्ये मोठे फेरबदल, अशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी?
संजय राऊत यांना आज (८ ऑगस्ट) पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मागील काही दिवसांपासून ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती.
हेही वाचा >>> “अरे जाऊद्या हो मंत्रिमंडळ, आधी बदनामी झाली त्याचं बघा” टीईटी घोटाळा प्रकरणी अब्दुल सत्तार आक्रमक
राऊतांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कोणत्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार याची माहिती देण्यास तुरुंग अधिकाऱ्यांनी नकार दिलाय. दरम्यान, सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून त्यांना स्वतंत्रपणे तुरुंगात ठेवण्यात येईल. राऊत यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. मात्र त्यांना आमदार नवाब मलिक किंवा अनिल देशमुख यांच्यासोबत ठेवण्यात येणार नाही. देशमुख हे आधीपासून पीएमएलए प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.