भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओंमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारीत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा एक पेनड्राईव्ह विधानपरिषद उपसभापतींकडे जमा केला. यावेळी दानवेंनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबादास दानवे विधानपरिषदेत म्हणाले, “आपलं राज्य फुले, शाहू, आंबेडकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि आहिल्याबाई होळकर यांचं आहे. असं असताना सत्ताधारी पक्षातील काही मंडळी या सगळ्या विचाराला छेद देत असल्याची स्थिती आहे. मी कोणत्या राजकीय पक्षाचं नाव घेत नाही. परंतु काही लोक आहेत, जे ईडी, सीबीआय आणि आयटी विभागाची भीती दाखवतात. या माध्यमातून काही लोकांना ब्लॅकमेलिंग करणं आणि खंडणी गोळा करण्याचं काम केलं जातंय. याबाबतच्या काही बाबी समोर आल्या आहेत.”

“संबंधित व्यक्ती त्यांच्या पक्षातल्या महिला-भगिनींना पद, जबाबदारी, मंडळं, महामंडळं देतो. माझा ईडी, सीबीआय आणि आयटी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. अशी भीती दाखवून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करतात. जे राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतात, त्याच पक्षाचा एक मोठा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने जे काही केलं आहेत, ते अतिशय धक्कादायक आहे. अनेक महिलांना राज्यसभा, विधानपरिषद आणि महामंडळात नियुक्त्या देतो, असं सांगून ब्लॅकमेलिंग केलं जात आहे,” असा आरोप अंबादास दानवेंनी केला.

“या प्रकरणात गुन्हा करणारी व्यक्ती कोण आहे, कोणत्या पक्षात आहे, हा विषय महत्त्वाचा नाही. ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे. म्हणून माझ्याकडे काही व्हिडीओज आले आहेत. काही माता-भगिनींनी अतिशय हिंमत करून हे व्हिडीओ माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत. त्या भगिनींना मी सलाम करेन. कारण हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला केंद्राची सुरक्षितता आहे. या सुरक्षितेचा वापर महिलांकडून खंडणी करण्यासाठी केला जातोय की काय? अशी स्थिती आहे,” असंही दानवेंनी नमूद केलं.

हेही वाचा- “यापुढे बरंच काही…”, किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओनंतर संजय राऊतांचं सूचक ट्वीट

अंबादास दानवे पुढे म्हणाले, “संबंधित भाजपा नेत्याने काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला आहे. माझ्याकडे आठ तासांचे व्हिडीओज आहेत. मी ते सभापतींना देणार आहे. हे कृत्य करणारी व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. विशेषत: मराठी भगिनींना ब्लॅकमेलिंग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे राजकीय दलाल, उपरे या महाराष्ट्रात आले आहेत. मराठी माता भगिनींचा छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या व्यक्तीचं नाव मी स्पष्टपणे घेतो, त्याचं नाव किरीट सोमय्या आहे. त्याने काय-काय केलंय, हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं आहे. अशा किरीट सोमय्याला सत्ताधारी पक्ष संरक्षण देणार का? ज्या माता-भगिनींनी टाहो फोडला आहे? त्यावर हे राज्यसरकार काय करणार? किरीट सोमय्यांच्या त्रासामुळे अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला आहे. अनेकांना तुरुंगात जावं लागलं आहे.”

हेही वाचा- किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…

“हे किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोही आहेत. त्यांचा एक पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे. यामध्ये अतिशय किळसवाणे व्हिडीओज आहेत. अशा लोकांवर सरकार कारवाई करणार का? याचं संरक्षण काढून घेणार का? की केंद्र सरकारकडून संरक्षण वाढवलं जाणार? याप्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी माझी मागणी आहे. हे पेनड्राईव्ह आपण बघा, यातून राज्य सरकारला निर्देश द्या. या व्हिडीओमध्ये किरीट सोमय्यांनी मराठी स्त्रियांविषयी ज्यापद्धतीने बोलले आहेत, ते अतिशय धक्कादायक आहे. हा पेनड्राईव्ह तुम्हाला सोपवतो. या सगळ्या विषयाचा तपास करावा, अशी विनंती करतो,” अशी मागणी अंबादास दानवेंनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya obscene video leak ambadas danve submit 8 hrs adult videos vidhan parishad rmm
Show comments