भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतच वृत्त दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ लीकप्रकरणावरून विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आठ तासांचे व्हिडीओ फुटेज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे जमा केले आहेत.
या कथित व्हायरल व्हिडीओप्रकरणी विरोधकांकडून टीका होत असताना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी किरीट सोमय्यांसाठी थेट परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे. किरीट सोमय्यांचा संबंधित व्हिडीओ खोटा आणि बनावट निघावा, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…
किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “सरपंचापासून अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी असला तरी त्या लोकप्रतिनिधीने नैतिकतेनं वागणं, ही राजकारणातील जबाबदारी आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांची ही व्हिडीओ क्लिप खोटी आणि बनावट निघावी, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.”
दुसरीकडे, किरीट सोमय्या यांनी संबंधित व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी, अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतच पत्रही त्यांनी ट्विटरवरून शेअर केलं. किरीट सोमय्या म्हणाले, “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांच्या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे.”