भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओंमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारीत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून आता विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार टीकास्र सोडलं.
सध्या किरीट सोमय्या यांची घरची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. ते मुलाच्या आणि कुटुंबाच्या नजरेतून उतरले आहेत. किरीट सोमय्या माझे वडील आहेत, असं सांगायची हिंमतही त्यांच्या मुलांमध्ये नाही, अशी टीका नितीन देशमुख यांनी केली. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
किरीट सोमय्या व्हिडीओ लीक प्रकरणी प्रतिक्रिया देताना नितीन देशमुख म्हणाले, “किरीट सोमय्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. तो एक नालायक आणि पिसाळलेला माणूस आहे. किरीट सोमय्यांनी अनेकांच्या मागे ईडीची चौकशी लावली. आमच्यामागेही ‘अँटी करप्शन’ विभागाची चौकशी लावली. पण आम्ही जेव्हा चौकशीला जायचो, तेव्हा आमच्या कुटुंबाने आणि आमच्या पत्नीने टिळा लावून आमचं स्वागत केलं. त्यानंतर आम्ही चौकशीला हजर राहिलो.”
हेही वाचा- किरीट सोमय्या VIDEO प्रकरण; शहाजीबापू पाटलांची देवाकडे प्रार्थना, नेमकं काय मागितलं?
“पण आजची किरीट सोमय्यांची घरची परिस्थिती वेगळी आहे. किरीट सोमय्या हे माझे वडील आहेत, असं सांगण्याची हिंमत त्यांची मुलं करत नाहीयेत. असं कृत्य किरीट सोमय्यांनी केलं आहे. ते आपल्या कुटुंबाच्या आणि मुलाच्या नजरेतून उतरले आहेत. एवढं नीच कृत्य त्यांनी केलं आहे,” अशी तिखट प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.
हेही वाचा- कथित आक्षेपार्ह VIDEO लीक प्रकरणानंतर किरीट सोमय्यांचं नवं ट्वीट; म्हणाले, “आज…”
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झाला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांच्या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे,” असं किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. याबाबत विचारलं असता नितीन देशमुख पुढे म्हणाले, “ते पत्र किरीट सोमय्यांनी लिहिलेलं नसून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडून लिहून घेतलं आहे. पक्षाची इज्जत लिलाव नाही झाली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीसांना वाटतं, त्यामुळे तसं पत्र लिहून घेतलं आहे.”
देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”
“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी. ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी,” अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.