भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागलीय. अजित पवारांनी आज महाराष्ट्राच्या १२.५० कोटी जनतेची दिशाभूल करण्याचा चांगला प्रयत्न केला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांनी दिलं नाही. ते करण्याची अजित पवार यांच्यात हिंमतच नाही, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या म्हणाले, “अजित पवार यांनी आज महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा चांगला प्रयत्न केला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ते करण्याची अजित पवार यांच्यात हिंमतच नाही. जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांनी बेनामी पद्धतीने घेतला. आता पण तेच चालवत आहेत. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, पण एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.”

“अजित पवार एकही उत्तर देऊ शकले नाहीत”

“आयकर विभागाच्या १० दिवस धाडी चालल्या आहेत. अजित पवार, पार्थ पवार, अजित पवारांच्या बहिणी, अजित पवारांचे बिझनेस पार्टनर, १,००० कोटींची बेनामी संपत्ती, त्यांच्याकडून १०० कोटीहून अधिकच गुंतवणूक अजित पवार यांच्या कंपनीत करण्यात आली. यावर अजित पवार एकही उत्तर देऊ शकले नाहीत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.

“जरंडेश्वर कारखाना गेल्या १० वर्षांपासून अजित पवारांची कंपनी चालवतीय”

किरीट सोमय्या म्हणाले, “जरंडेश्वर विकत घेणाऱ्या गुरू कमोडिटी कंपनीला अर्धे पैसे म्हणजे ३२ कोटी रुपये अजित पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल आणि ग्रुप कंपनीने दिले. गेली १० वर्ष हा कारखाना जरंडेश्वर शुगर कारखाना प्रायव्हेट लिमीटेड कंपनी चालवीत आहे. त्याचे मालक अजित पवार, त्यांच्या २ बहिणी आणि सुनेत्रा अजित पवार आहेत.”

हेही वाचा : किरीट सोमय्यांकडून ‘जरंडेश्वर’ प्रकरणी ‘ईडी’ला कागदपत्रे सादर

“साखर कारखाने विकले गेले असतील. त्याच्याविषयी कुणाचीही हरकत नाही. परंतू बेनामी भ्रष्ट पद्धतीने घोटाळा केला याचा तपास होणारच,” असा इशारा सोमय्या यांनी अजित पवार यांना दिलाय.

Story img Loader