भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. शुक्रवारी पुणे महापालिकेमध्ये सोमय्या यांचं भाजपा कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. तसेच पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपाच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी अनिल देखमुखांबरोबरच आता अनिल परब आणि संजय राऊत यांनाही तुरुंगात जावं लागणार असल्याचा दावा केलाय.बाकी लोकांनी

काय काय जबाब दिलाय…
अनिल परब आणि संजय राऊत यांना लवकरच तुरुंगामध्ये जावं लागणार आहे असं सोमय्या म्हणाले आहेत. अनिल देशमुखांच्या तुरुंगाच्या बाजूची जागा सॅनिटाइज करुन ठेवा पुढचा नंबर अनिल परब आणि संजय राऊतांचा आहे, असं सोमय्यांनी म्हटलंय. “संजय राऊतांचा एकेकाळचा सहकारी प्रवीण राऊत त्यांच्याबद्दल काय काय बोललाय. बाकी लोकांनी काय काय जबाब दिलाय हे पाहता लवकरच त्यांना तुरुंगात जावं लागणार आहे,” असं सोमय्या म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर व्यवस्था करावी कारण…
“तुरुंगामधील अनिल देखमुख यांच्या डावीकडील आणि उजवीकडील खोली सॅनिटाइज करण्याची उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर व्यवस्था करावी कारण अनिल परब आणि संजय राऊत दोघांना जेलमध्ये जावं लागणार,” असंही सोमय्या म्हणालेत.

कालही दिला इशारा…
“उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना अशा धमक्या देऊन किरीट सोमय्या घाबरत असल्याचं वाटत असेल. यांच्यापैकी एकजण अनिल देशमुखांच्या खोलीत विराजमान होतील तेव्हा कळेल,” असा इशारा सोमय्या यांनी शुक्रवारी पुणे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिलेला.

राऊत म्हणतात, मराठी माणूस असल्याने…
दरम्यान सोमय्यांकडून मागील काही काळापासून होणाऱ्या आरोपांबद्दल शुक्रवारी राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, “माझी संपत्ती त्यांनी काय असेल ती घेऊन टाकावी. तुमच्या संपत्त्या काय आहेत ते बघा. मी मराठी माणूस आहे, माझी महाराष्ट्रातच संपत्ती असायला हवी. पण ती नाहीय. मराठी माणसाच्या हातात पैसे खेळू नये यासाठी षडयंत्र आहे,” असं म्हटलं होतं.

“मराठी माणूस म्हणून…”
यावरुनही सोमय्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. “मराठी माणूस म्हणून मराठींना लुटायचं, त्यांची हत्या करायची. डेकोरेटला पकडून आणलं वैगैरे आरोप करतात. मुलीचं लग्न करा आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही म्हणता डेकोरेटला पकडून आणलं. तुम्ही डेकोरेटला काय ते २५, ५० लाख पैसे दिल्याचं बिल असेल तर मीडियासमोर दाखवा,” असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा…
दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. “महाराष्ट्राच्या जनतेने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ठेका उद्धव ठाकरेंना दिला आहे का? उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या मदतीने कोविडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केलं असून कारवाई झाली पाहिजे. मी आज पुन्हा एकदा पोलीस, महापालिका यांना आग्रह करणार आहे की, घोटाळा करणारी कंपनी हेल्थकेअर लाइफलाइन यांच्यावर कारवाई करा,” अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

धमकी कोणाला देता
“गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही. कारवाई कशी होत नाही, पाहतोच,’” असा इशारा यावेळी त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, “सत्काराला महत्व नाही. त्या कंपनीवर कारवाई करावी लागणारच आहे. संजय राऊतांना जाब द्यावा लागणार. संजय राऊत धमकी कोणाला देतात?”

एवढी मस्ती आहे की…
“संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की मी लोकांचा जीव घेणार. बोगस कंपन्याकंडून कंत्राट घेणार, महाराष्ट्रातील लोकांची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असं वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अनिल देशमुख जेलमध्ये गेलेत. संजय राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच,” असा विश्वास किरीट सोमय्यांनी व्यक्त केला आहे.

पालिकेत घुसणाऱ्या गुंडांचा व्हिडीओ…
“ठाकरेंनीच हे सगळं घडवून आणलं. कंपनीला ब्लॅकलिस्ट उद्धव ठाकरेंनी केलं आणि आदित्य ठाकरेंनी त्यांना कंत्राट दिलं. पुणे महापालिकेत १०० लोक कसे घुसले? आज इतके पोलीस असताना त्यादिवशी का पळून गेले. एक पोलीस कॅम्पसमध्ये नव्हता. पालिकेत घुसणाऱ्या गुंडांचा व्हिडीओ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना दिसत नाही का? त्यांना अटक का झाली नाही?,” अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी केला. हत्येचा प्रयत्न झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार यावेळी त्यांनी केला. अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader