राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. नवाब मलिक यांनी दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार केल्याचं न्यायालयानं देखील निरीक्षण नोंदवल्यानंतर त्यांच्या अडचणीत भर पडल्याचं दिसत असताना दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणावरून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
“उद्धव ठाकरे, आता या शरद पवारांसोबत रस्त्यावर”
“उद्धव ठाकरेंपासून सगळं मंत्रिमंडळ नवाब मलिकांसाठी मैदानात आलं होतं. आता न्यायालय सांगतंय की नवाब मलिक म्हणजे दाऊद. आता उद्धव ठाकरे साहेब, या रस्त्यावर शरद पवारांसोबत आणि न्यायालयाविरुद्ध परत काढा मोर्चा. नाहीतरी तुमचे प्रवक्ते रोज न्यायालयाविरोधात बोलतात. उद्धव ठाकरेंनी जर सुरुवात केली की न्यायालय देखील पाकिस्तानचे आहेत, न्यायाधीशही मोदींचे आहेत तर आश्चर्य नाही वाटणार”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
“शरद पवार, उद्धव ठाकरेंना सगळे व्यवहार माहिती होते”
किरीट सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांचे सर्व व्यवहार उद्धव ठाकरेंना माहिती होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. “खरंतर ही चौकशी न करताही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सगळे आर्थिक व्यवहार माहिती होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तर बिल्डर आहे. बिल्डर लोकांना सगळं कळतं. मातोश्रीपासून फक्त चार किलोमीटरवर गोवावाला कंपाऊंड आहे. म्हणून उद्धव ठाकरेंना एफएसआयचा रेट वगैरे सगळं माहिती होतं. उद्धव ठाकरेंचे एडंट यशवंत जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत अशा अनेक जुन्या बिल्डिंग विकत घेतल्या. हे नवाब मलिक काही लाखांत १०० कोटी बिझनेस टर्नओव्हरचा प्लॉट विकत घेतात. दाऊदचे पार्टनर नवाब मलिक, नवाब मलिकचे पार्टनर उद्धव ठाकरे उत्तर द्या”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
“उद्धव ठाकरे, तुमचे दाऊदशी काय संबंध आहेत?”
“मला तर शंका आहे की आता नवाब मलिकांना वाचवणारे उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यावं लागेल की तुमचे आणि दाऊदचे काय संबंध आहेत. काय बोलणं झालं आहे”, असा खोचक सवाल सोमय्या यांनी केला आहे.
“संजय राऊत रोज मनोरंजन करतात”
“संजय राऊत रोज मनोरंजन करतात. रोज काही ना काही बोलतात. आता राज्यातील जनता हसायला लागली आहे. मूळ मुद्दा त्यांना डायव्हर्ट करायचा आहे. त्यांना कल्पना होतीच की नवाब मलिक – दाऊदचे संबंध बाहेर येणार. म्हणून हे थोतांड उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांद्वारे लक्ष वळवण्यासाठी हे केलं. एवढं सिद्ध होऊनही त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जात नाही. उद्धव ठाकरेंना धमकी शरद पवारांची आहे की दाऊदची?” असा सवाल किरीट सोमय्यांनी केला.
“मी स्टेजवर बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐकली आहेत. ९२-९३मध्ये ज्या दंगली झाल्या, त्यानंतर शरद पवार आणि दाऊद एकाच विमानात गेले असं सांगणारी बाळासाहेबांची भाषणं मी ऐकली आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी मुलाने सगळंच गहाण ठेवायचं, हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात”, असं देखील किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.