भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने महाविकासआघाडीमधील नेत्यांन आणि मंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. अनिल परब, अनिल देशमुख, अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यामध्ये आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा देखील समावेश झाला आहे. जालना सहकारी साखर कारखान्यातील कथित घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अर्जुन खोतकरांनी जालन्यामध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळ्याची कॉपी केल्याचा देखील दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
“पैसा, घोटाळा आणि जमीन हडप करणं”
चारच दिवसांपूर्वी जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणी अर्जुन खोतकर यांच्या घरी दिवसभर ईडीनं छापा टाकून तपास केला होता. त्यानंतर आज किरीट सोमय्यांनी जालन्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन अर्जुन खोतकरांवर आरोप केले आहेत. “महाभारताच्या अर्जुनचं लक्ष्य होतं अधर्माचा विनाश करणं. पण उद्धव ठाकरेंचे जे अर्जुन आहेत, त्यांचं लक्ष पैसा, घोटाळा आणि शेतकऱ्यांची जमीन हडप करणे हे आहे. जालना साखर कारखान्याची जमीन तर त्यांनी गिळंकृत केलीच पण एपीएमसीवर अर्जुन खोतकर बिझनेस सेंटर.. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वसुली सेनेसाठी सत्ता हे बिझनेस सेंटर आहे. या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन वेगवेगळ्या विभागांना दिलं आहे”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
“आज प्रत्यक्ष बघण्यासाठी आलो तेव्हा अनेक नव्या गोष्टी समोर आल्या. ६९ कोटी ९९ लाख ९१ हजार ५०० रुपये बाजारमूल्य असणारी जमीन अर्जुन खोतकरांनी २७ कोटी ५८ लाख ८६ हजार ७३३ रुपयांच्या खरेदीखतावर घेतली”, असा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला. “२०१०च्या आसपास एनसीपी सरकारने शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं गिळंकृत करण्याचं कटकारस्थान सुरू झालं”, असं देखील सोमय्या म्हणाले.
जरंडेश्वरची कॉपी?
दरम्यान, अर्जुन खोतकरांनी जरंडेश्वर घोटाळ्याची कॉपी केल्याचा खोचक टोला किरीट सोमय्यांनी यावेळी लगावला. “जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची कॉपी केली आहे. तिथे २७ हजार शेतकऱ्यांची लुबाडणूक झाली, इथे १० हजार शेतकऱ्यांना लुटलं गेलं”, असं ते म्हणाले.