भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी (१७ जुलै) संध्याकाळपासूनच यावर चर्चा सुरू आहेत. या व्हायरल व्हिडीओवरून विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्यासह भाजपावर हल्लाबोल केला आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असताना काही भाजपा नेत्यांनी मात्र हा व्हिडीओ बनावट असल्याचा दावा केला आहे. तर अपक्ष आमदार रवी राणा यांनी थेट शिवसेनेच्या नेत्याकडे बोट दाखवलं आहे.
आमदार रवी राणा म्हणाले, मला असं वाटतंय की, ती खोटी बातमी असावी किंवा लोकांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचं काम कोणीतरी करतं आहे. यामागे कोण असेल तर तो अनिल परब आहे. या प्रकरणाच्या चौकशीत नक्कीच अनिल परबचं नाव पुढे येईल. यामागचा खरा सूत्रधार अनिल परब असेल.
किरीट सोमय्या यांचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र
माजी खासदार नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, “देवेंद्रजी, आज संध्याकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तिंनी माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. अशा प्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स त्यांच्याकडे आहेत, असेही दावे करण्यात आले आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी.”
हे ही वाचा >> “मी आत्ता भविष्यवाणी करतो, हे सचिन अहिरसुद्धा…”, विधान परिषदेत सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य
या व्हिडीओतील ती महिला कोण? : अनिल परब यांचा प्रश्न
विधान परिषदेत बोलताना आमदार अनिल परब यांनी त्या कथित व्हिडीओत असलेली महिला कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला. परब म्हणाले, “काल ज्या माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला त्याने अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे त्यांचंही आयुष्य उद्ध्वस्त व्हावं, अशी आमची इच्छा नाही. परंतु, या व्हिडीओची सत्यता बाहेर यायला हवी. या व्हिडीओतील ती महिला कोण आहे हे सर्वांना समजलं पाहिजे. त्या महिलेने का आरोप केले आहेत. आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती खरी खोटी ती तपासून पहावी.”