भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, त्या इमारतीशी तुमचा संबंध काय हे भुजबळांनी स्पष्ट करावं, अशी मागणी आज किरीट सोमय्या यांनी केली आहे. आपल्या नाशिक इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुम्ही तुमच्या परिवारासोबत ज्या महालात राहता, तो महाल उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी असं आव्हानंही त्यांनी दिलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कागदावर या नऊ मजली महालाचा मालक परवेझ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे. परवेझ कन्स्ट्रक्शनशी आपला संबंध काय? त्यांना तुम्ही भाडं देता की त्यांच्याकडून विकत घेतलं आहे?
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा….
त्याचबरोबर त्यांनी परवेझ कंपनीसोबतच इतरही काही कंपन्यांची नावं घेतली आणि या कंपन्या बोगस असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ह्या कंपन्या चालवणाऱ्या लोकांना ईडीने अटक केली होती, आयकर विभागाने त्यांचं स्टेटमेंट घेतल्यावर त्यांनी सांगितलं की, भुजबळांनी आम्हाला रोख पैसे दिले, ते आम्ही या कंपन्यांमध्ये टाकले, असं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळ आपल्या परिवारासोबत ज्या घरात राहतात, ती इमारतही बेनामी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
यावेळी मालेगाव, खारदांडा, पनवेल या ठिकाणी छगन भुजबळ यांची प्रचंड प्रमाणात बेनामी संपत्ती आहे, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या संपत्तीपैकी एका ठिकाणी भेट दिल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच शनिवारी आपण भुजबळांच्या राहत्या घरी भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.