Baba Maharaj Satarkar Died Marathi News: प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता.वास्तविक निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव होतं. मात्र, पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळालं ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिलं. नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते.
सातारकर फडाची परंपरा
महाराष्ट्राला प्रदीर्घ अशी कीर्तनाची व ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा राहिली आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फड म्हणून सातारकर घराण्याच्या फडाचं नाव मानानं घेतलं जातं असे. गेल्या चार पिढ्यांपासून सातारकरांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती. स्वत: बाबा महाराज सातारकरांनीही ही परंपरा मोठ्या अभिमानाने जपली आणि वाढवली होती! आता त्यांच्या कन्या ह. भ. प. भगवती महाराज ही परंपरा पुढे चालवत आहेत.
शास्त्रीय गायनाचेही धडे
बाबा महाराज सातारकर यांनी जसं वकिलीचं शिक्षण घेतलं होतं, तसंच त्यांनी शास्त्रीय संगीताचंही शिक्षण घेतलं होतं. ११व्या वर्षापासूनच त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते.
१९६२ साली आप्पा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर सातारकर घराण्याची कीर्तन-प्रवचन परंपरा बाबा महाराज सातारकर यांनी पुढे चालू ठेवली.
भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बाबा महाराज सातारकर यांनी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केलं. या सप्ताहांना लाखो भाविकांची मोठी गर्दी होत असे.
बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातू शोक व्यक्त करण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एक्सवर (ट्विटर) आपल्या भावना व्यक्त करताना बाबा महाराज सातारकर यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही एक्सवर बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात पत्नी रुक्मिणी सातारकर यांचंही निधन
दरम्यान, याचवर्षी मार्च महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी ह. भ. प. रुक्मिणी उर्फ माई सातारकर यांचंही ८६व्या वर्षी निधन झालं. बाबा महाराज सातारकर यांच्यासमवेत रुक्मिणी सातारकर यांनीही वारकरी संप्रदाय परंपरा पुढे वाढवण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली. खाद्यसंस्कृतीबाबत विशेष आवड असणाऱ्या रुक्मिणी सातारकर यांनी त्याबाबत विपुल लेखनही केलं होतं.