अहमदनगरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. इंदोरीकर महाराजांना संगमनेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुत्रप्राप्तीविषयी इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यानंतर इंदोरीकर महाराजांवर संगमनेर जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला सुरु होता आणि इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या होत्या. आज कोर्टाने इंदोरीकर महाराजांचे वकील के.डी. धुमाळ आणि अंनिस या दोहोंची बाजू ऐकून घेतल्यानंतर इंदोरीकर महाराजांना २० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज कोर्टात काय घडलं?

इंदोरीकर महाराज सुनावणीच्या एक दिवस आधीच स्वतः कोर्टात हजर राहिले होते. खरंतर या प्रकरणावर शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र इंदोरीकर महाराजांना २४ तारखेला इतर जिल्ह्यात नियोजित कार्यक्रम असल्याने ते आजच कोर्टात उपस्थित राहिले. एक दिवस आधी कोर्टात उपस्थित राहतो अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली होती. जी कोर्टाने मान्य केली. त्यानंतर त्यांना २० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

काय आहे हे वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण?

सोशल मीडियावर इंदोरीकर महाराजांच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होत असतात. तसंच ते कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असतात. या दरम्यान २०२० मध्ये आपल्या कीर्तनात पुत्रप्राप्तीविषयी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच प्रकरणात आता इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.

इंदोरीकर महाराजांना कनिष्ठ न्यायालयाने नकार दिला होता. तसंच या न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेशही दिला होता. ज्यानंतर इंदोरीकर महाराजांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने गु्न्हा रद्दबातल ठरवला होता. मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात आव्हान देण्यात आलं.

उच्च न्यायालयाने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत संगमनेर न्यायालयात सुनावणी घेण्याचे आदेश दिले. यानंतर न्यायालयाने काही दिवसांपूर्वी इंदोरीकर यांना समन्स बजावले. मात्र ते सुनावणीला हजर राहिले नाहीत. पोलिसांनी तेव्हा इंदोरीकर महाराज यांची भेट झाली नसल्याचं न्यायालयात सांगितलं होतं. अखेर या प्रकरणात आज इंदोरीकरांना दिलासा मिळाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirtankar indorikar maharaj gets big relief about his statement from sangamner court rno scj