मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समुदायाकडून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. दरम्यान, धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील माडज येथे एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. किसन माने असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. संबंधित तरुणाने बुधवारी गावातील शिवकालीन तलावात उडी घेवून आत्महत्या केली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच त्याने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
याप्रकरणी आता प्रत्यक्षदर्शीने प्रतिक्रिया दिली आहे. किसन माने या तरुणाने नेमकी आत्महत्या कशी केली? याबाबतचा संपूर्ण घटनाक्रम प्रत्यक्षदर्शी मित्राने सांगितला आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा- “…तर ते उपोषण सोडायला तयार”, मनोज जरांगेंच्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “बारा वाजेपर्यंत…”
नेमकं काय घडलं?
किसन माने यांचे मित्र व प्रत्यक्षदर्शी म्हणाले, “तो (किसन माने) मागील दोन-तीन दिवसांपासून मराठा आंदोलनात सहभागी होत होता. तो बातम्या ऐकायचा. त्यामुळे आपल्याला आरक्षण मिळत नाही, असं त्याला वाटलं. आज मुख्यमंत्री पदावर मराठा व्यक्ती आहे, तरीही आपल्याला आरक्षण मिळत नाही, त्यामुळे मी काहीतरी करणार, असं तो बोलला. मी आत्महत्या करणार, असंही त्याने सांगितलं. पण आम्हाला त्याचं बोलणं खोटं वाटलं.”
हेही वाचा- “आरक्षण देणार नाही, असं कोर्टानेही…”, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं विधान
“मी मेलो तरी चालेल पण माझ्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालंच पाहिजे, असं तो म्हणाला आणि पळत जाऊन त्याने तलावात उडी मारली. मीही त्याच्यामागे पळालो, कपडे काढले आणि पाण्यात उडी मारली. पण त्याला वाचवण्यात मला यश आलं नाही. मी त्याला वाचवू शकलो नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मी गेलो तरी चालेल, असं म्हणत त्याने उडी मारली. शेवटपर्यंत त्याचा हात वरच्या दिशेनं होता”, असा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शीने सांगितला.