नाशिक: मध्य रेल्वेच्या नाशिक-मनमाड या मध्यवर्ती स्थानकांतून उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण बाजारपेठेत नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणारा शेतीमाल जलद पोहचविणारी आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक वाहिनी ठरलेल्या सावदा ते आदर्श नगर दिल्ली या किसान रेल्वेने ९०० वी फेरी पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला आहे. या रेल्वेतून आतापर्यंत तीन लाख १० हजार ४०० टन नाशवंत मालाची वाहतूक करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल ही पहिली पसंती ठरली आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानच्या हरित मोहिमेंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले आहे. सोलापूर विभागातून डाळिंब, द्राक्ष, लिंबू, सिमला मिरची, कस्तुरी टरबूज, पेरू, सिताफळ, बेर (भारतीय मनुका), लातूर आणि उस्मानाबाद विभागातून फुले नाशिक विभागातून कांदा, भुसावळ-जळगांव येथून केळी, नागपूर विभागातून संत्री आणि इतर फळे तसेच भाजीपाला किसान रेल्वेच्या माध्यमातून दिल्ली ,बिहार, पश्चिम बंगालसारख्या दूरच्या बाजारपेठांमध्ये पोहोचविणे शक्य झाले आहे. या रेल्वेने मोठय़ा बाजारपेठांसह उत्पादनास चांगली किंमत, जलद वाहतूक, कमीत कमी नुकसान या कारणामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागत आहे. किसान रेल्वे ही ग्रामीण महाराष्ट्रांतील शेतकऱ्यांसाठी विकास आणि समृध्दीचे इंजिन बनल्याचे चित्र आहे. जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५० टक्के अनुदानासह कृषी उत्पादनासह मोठय़ा आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून किसान रेल्वेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवी संधी उपलब्ध केली. पहिली किसान रेल्वे सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने ९०० फेऱ्यांमधून तीन लाख १० हजार ४०० टन नाशवंत मालाची वाहतूक केली. सात ऑगस्ट २०२० रोजी पहिली किसान रेल्वे धावली. २८ डिसेंबर २० रोजी किसान रेल्वेची १०० वी फेरी चालविण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला. ५०० वी फेरी १२ ऑगस्ट रोजी तर एक जानेवारी २०२२ रोजी किसान रेल्वेची ९०० वी फेरी पूर्ण झाली.
मध्य रेल्वेत सध्या देवळाली-मुजफ्फरपूर, सांगोला-मुजफ्फरपूर, सांगोला- आदर्श नगर दिल्ली , सांगोला-शालीमार, सावदा-आदर्श नगर दिल्ली या सहा किसान रेल्वे धावत आहेत. किसान रेल्वेच्या ९०० फेऱ्यांमधून जलद आणि सुरक्षित वाहतुकीबरोबर नवीन बाजारपेठांमधील प्रवेशासह शेतकऱ्यांना किसान रेल्वेचे अनेक फायदे अधोरेखित झाले.
–अनिलकुमार लाहोटी (महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे)