दोन दिवसांपूर्वी शिवसेना ( शिंदे गट ) आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पत्रकाराने केलेल्या टीकेवरून किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केली होती. आता तेच पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. याप्रकरणावर भाष्य करणारे एक वृत्त संदीप महाजन यांनी केलं होतं. हेच वृत्त खटकल्याने किशोर पाटलांनी संदीप महाजनांना फोनवरून शिवीगाळ केली होती. अशातच आता संदीप महाजन यांना काही जणांनी मारहाण केल्याची व्हिडीओ समोर आला आहे.
यावरून “सत्तेची नशा अशी असते का?” असा सवाल रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारला आहे.
हेही वाचा : “भाजपाने नाही तर शिवसेनेनं युती तोडली”, मोदींच्या विधानावर शिंदे गटातील नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले…
ट्वीट करत रोहित पवार म्हणाले, “पत्रकाराला फोनवर आई-बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची… का? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून… विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल.”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना , स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो, सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे. परंतु, एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे,” अशी खंतही रोहित पवार यांनी व्यक्त केली.