मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर दुसरीकडे पेडणेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यामुळे माझ्या सासूबाईंचं निधन झालं असा गंभीर आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर आता सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आरोप केलेला नसून घोटाळा समोर आणला आहे, असे सोमय्या म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते.
हेही वाचा >>> ‘अद्याप वाद संपला नाही’ म्हणणाऱ्या बच्चू कडूंची आज अमरावतीमध्ये बैठक, दिव्यांग व्यक्तीच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करणार
मला थोडी मराठी येते. माझी पत्नी, सुनबाई मराठी आहे. मराठीची मोडतोड करू नका. मी पेडणेकर यांच्यावर आरोप केलेले नाहीत, तर घोटाळा उघड केला आहे. त्यामुळे आता त्यांना चौकशीला सामोरे जावेच लागणार आहे. मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी फसवणूक केली आहे. उद्धव ठाकरे यांनीच पेडणेकर यांची महापौर म्हणून नियुक्ती केली होती. पेडणेकर यांना उत्तर तर द्यावेच लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरवलेले आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.
हेही वाचा >>> “हे तीन महिन्याचं बाळ, त्यांनी बाळासाहेब ठाकरे…”, गुलाबराव पाटलांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
किशोरी पेडणेकर यांचा काय आरोप?
“दोन वर्षांपूर्वी सर्व माहिती दिलेली असतानाही किरीट सोमय्या वारंवार तीच कागदपत्रं दाखवून आरोप करत आहेत. बातम्या पाहून माझ्या सासूबाईंच्या मनावर फार परिणाम होत होता. मी शुक्रवारी त्यांना भेटण्यासाठी आले, तेव्हा त्या त्रस्त दिसत होत्या. त्यांचं वयही झालं होतंच. संध्याकाळी ६ वाजता आम्ही त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी येणार होतो. आमच्याकडे १०-१५ दिवस राहायला घेऊन जाणार होतो. पण बातमी पाहिल्यानंतर ती घाबरली होती. बातम्यांचा तिच्यावर फार परिणाम होत होता. माझा नवरा, मुलाला फोन करुन सतत चौकशी करायची. ती फार घाबरलेली असायची. यांनी आमच्या पेडणेकर कुटुंबातील एक बळी आज घेतला,” असा आरोप त्यांनी केला होता.