मशिदीवरील ‘भोंगे’ हटवा या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाष्य केलं होतं. तर, औरंगाबादमध्ये ४ मे ला झालेल्या सभेत मशिदीवर ‘भोंगे’ हटवावे अन्यथा, हनुमान चालीस लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यात आता मनसेने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ‘भोंगे’ लावले आहेत. यावरून शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेला ‘सरड्या’ची उपमा दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मनसेची भूमिका सरड्यासारखी रंग बदलणारी आहे. भोंगे वाजवले, पुन्ह बंद केलं, लोकांना किती गृहित धरणार. किती खोटे बोलायचं. त्यांच्या पक्षाचे नाव वेगळं आणि प्रत्यक्षात कृती वेगळी आहे. लोकांच्या मनात आपल्या पक्षाविषयी काय प्रतिमा तयार होते, याचा सुद्धा विचार करावा,” असा सल्लाही पेडणेकर यांनी मनसेला दिला आहे.
हेही वाचा : “जरा आपल्या वयानुसार…”, रावसाहेब दावनेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
किशोरी पेडणेकर यांना एमआयएबरोबर युती करायची आहे. तसेच, सुषमा अंधारे आल्यामुळे पेडणेकर यांचं अस्तित्व धोक्यात आलं, असं मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं. त्यावरही पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणाचेही अस्तित्व कोणामुळे धोक्यात येत नसते. तुमची अस्तित्व धोक्यात होती, म्हणून तुमच्या पक्षप्रमुखाला वेगळा पक्ष काढावा लागला. बाळासाहेंनी सांगितलं आहे, राज ठाकरेंचं षडयंत्र ओळखलं होतं. त्यामुळे त्यांना किती उत्तर द्यावं हा संशोधनाचा विषय आहे,” असे पेडणेकर यांनी म्हटलं.