राणीच्या बागेत जन्माला आलेल्या पेंग्विनचं आणि वाघाचं नुकतंच नामकरण करण्यात आलं . त्यांना इंग्रजी नावे दिल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. त्यांच्या टीकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुढच्या वेळी हत्तीच्या पिल्लाचं नाव चंपा आणि माकडाच्या पिल्लाचं नाव चिवा ठेवू, असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “भाजप टीका करतंय ना मराठी नावं ठेवायला हवी म्हणून मग पुढच्या वेळी चंपा आणि चिवा नाव ठेवू. हत्तीच्या पिल्लाचं नाव चंपा ठेवू आणि एक माकडाचं पिल्लू येणार आहे त्याचं चिवा ठेवू. केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणं सोडा”.
पेंग्विनच्या पिल्लाचं नाव ऑस्कर ठेवल्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना पेडणेकर म्हणाल्या, “आमच्या मुंबईच्या मध्यमवर्गीय माणसांना परदेशासारख्या वातावरणाचा अनुभव घेऊ द्या ना, यांची नक्की पोटदुखी काय आहे? टीका करून फक्त चमकायचं असतं यांना. तुम्हाला ऑस्कर पुरस्कार चालतो. मग ऑस्कर नाव का नाही? यांच्या टीकेला आता कधीच उत्तर देणार नाही”.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ यांनी आज सकाळी एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोत एक व्यक्ती माध्यमांशी बोलताना दिसत आहे. “साहेबांनी मराठी पाट्या लावायला सांगितल्या आहेत, मराठी नामकरण करण्यास नाही”, असं या फोटोवर लिहिलं आहे. तर याच फोटोत दोन पेंग्विनही दिसत आहे. त्यावर लिहिलं आहे की, “ताईने किती छान नाव दिलं तुला ऑस्कर बाळ”. तर ट्वीटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, “मराठीचा पुळका देखाव्यापुरता! “
.