शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद नाराज असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच त्या शिंदे गटात सामील होती, असा दावा केला जात आहे. असे असताना आज (२२ ऑक्टोबर) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली होती, असे सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकात्मक भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यभर दौरा करायला हवा होता. त्यांना भेटण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागायची. त्यांच्या बाजूची चार माणसं आमचा संदेश उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू देत नव्हते, असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर आता उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले आहे. सय्यद यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा >>>> दीपाली सय्यद नाराज आहेत? शिंदे गटात जाणार का? दिली सर्व प्रश्नांची उत्तरं, म्हणाल्या “माझी कोणावरही…”
“दीपाली सय्यद यांनी कोणाला भेटावे का भेटावे? हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये एक स्पर्धा लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी जेवढे चुकीचे मत व्यक्त कराल तेवढे मोठे पद मिळेल, असा प्रकार सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली की इप्सित साध्य होते. त्यामुळे दीपाली सय्यद असो किंवा अन्य कोणी, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
हेही वाचा >>>> उद्धव ठाकरे गटातील बडा नेता नाराज? गिरीश महाजन यांच्या विधानानंतर चर्चेला उधाण!
दीपाली सय्यद काय म्हणाल्या होत्या?
दीपाली सय्यद यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना मी शिंदे गटात जाणार की नाही ते लवकरच समजेल. मात्र लोकांची तशी इच्छा आहे, असे त्या स्पष्टपणे म्हणाल्या आहेत.
मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती. भविष्यातही त्यांनी एकत्र यावे, असे मला वाटते, असेही दीपाली सय्यद यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या दौऱ्याला यश मिळो. माझ्या शुभेच्छा असतील. त्यांनी अगोदरच या दौऱ्यांना सुरुवात करायला हवी होती. माझे पदाधिकारी किती मजबूत आहेत, हे नेत्याने तपासले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर शिवसेना पक्षात फूट पडली नसती, असेही दीपाली सय्याद म्हणाल्या.
हेही वाचा >>>> “जयंत पाटलांच्या घरावर भाजपाचा झेंडा लागणार”, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत खळबळ
माझा आवाज मातोश्रीपर्यंत जाण्यापासून रोखणारे बरेच लोक होते. आगामी काळात नक्कीच त्यांची नावे सांगेन. काही काम करायचे असेल तर आता आम्ही थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो. आम्ही ते काम मुख्यमंत्र्यांना सांगतो. त्याची पुढे अंमलबजावणीही होते. ते खूप महत्त्वाचे आहे, असेही दीपाली सय्यद म्हणाल्या.
काही गोष्टींसाठी नियोजन आखावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो. या गोष्टी कृतीतूनच लोकांपर्यंत पोहोचू शकतात. मागील काही दिवसांपासून मी त्याच कामात होते. लवकरच ते लोकांपर्यंत पोहोचेल. प्रत्येकजण आपापले काम करतो. माझी कोणावरही नाराजी नाही. प्रत्येकजण आपली जागा स्वत:च्या कर्तृत्वाने मिळवत असतो. त्यामुळे मी नाराज नाही, असेही दीपाली सय्यद यांनी स्पष्टपणे सांगितले.