शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २१ सप्टेंबर रोजी गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली. या टीकेनंतर शिंदे गट तसेच भाजपाचे नेतेही आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी आज (२२ सप्टेंबर) थेट पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर खरपूस शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांच्याकडे वाकड्या नजरेने बघाल, तर जागेवर ठेवणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर आता ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणेंना लक्ष्य केलंय. त्या मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होत्या.
हेही वाचा >>>> दसरा मेळाव्यासाठी शेवटचा पर्याय काय? शिवसेना रस्त्यावरची लढाई लढणार? अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
शिंदे गट आणि भाजपाकडे वाकड्या नजरेने बघू नका असे नारायण राणे म्हणाले आहेत. त्याला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी सुपारी घेतली आहे का ते सांगावे. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात. तुम्ही एका गुंडाने सुपारी घेतल्याप्रमाणे बोलत आहात. प्रत्येक पक्षाचा पक्षप्रमुख आपल्या पक्षासमोर मांडणी करत असतो. त्यांना एवढी मिरची लागण्याची काय गरज? एक केंद्रीय मंत्री सुपारी घेतल्यासारखे बोलत असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.
हेही वाचा >>>> आधी देशपांडे म्हणाले ‘तुमचीही खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा,’ आता शिवसेनेचे जशास तसे उत्तर, परब म्हणाले “मनसेकडून फक्त…”
वयाने वृद्ध झालेले माजी मुख्यमंत्री तसेच सध्याचे केंद्रीय मंत्री यांच्या बुद्धीत किती क्रोध आहे, हेच दिसत आहे. त्यांच्या बोलण्यात काहीही ताळमेळ नाही. असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच नारायण राणे भाजपामध्ये गेलेच आहेत. पण बंडखोरी केलेले आमदारही एकीकडे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, असे म्हणत आहेत. तर दुसरीकडे ते भाजपाची स्क्रीप्ट चालवत आहेत, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.