काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त करून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं होतं. तेव्हा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक आणि नंतर सुटका अशा अनेक नाट्यमय घडामोडींमुळे राणा दाम्पत्य चांगलंच चर्चेत आलं. तेव्हापासून राणा दाम्पत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सातत्याने आरोप केले आहेत. रामा दाम्पत्याने अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर देखील नुकतेच गंभीर आरोप केल्यानंतर त्यावरून राजकीय वातावरण पेटलं आहे. राणा दाम्पत्याच्या आरोपांवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांवर गंभीर शब्दांत टीका केली असून त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे आरती सिंह यांच्यावर आरोप?

रवी राणा यांनी नुकताच आरती सिंह यांच्यावर उद्धव ठाकरेंचं नाव घेत आरोप केला आहे. “आरती सिंह यांनी अडीच वर्षांत महिन्याला ७ कोटी रूपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोहोचवले. याप्रकरणाची आता उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत”, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.

“आम्ही घरंदाज बायका तिच्यावर..”

दरम्यान, यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणांचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर शब्दांमध्ये टीका केली आहे. “तिच्यावर मी बोलणार नाही. ज्या मुलीने १३व्या वर्षी घाणेरड्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली आहे, तिच्यावर आम्ही काय बोलणार? आम्ही घरंदाज बायका तिच्यावर बोलणार नाही”, असं त्या म्हणाल्या.

“…तर यांना भाजपात कुणी स्थान देणार नाही”, एकनाथ शिंदेंवर किशोरी पेडणेकरांची संतप्त टीका!

काही दिवसांपूर्वी नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत जाहीर आव्हान दिलं होतं. त्यावरूनही दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं होतं. “तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच. त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे”, अशा शब्दात नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता.

रवी राणांचे आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, “महिन्याला सात कोटी उद्धव ठाकरेंना…”

“..तेव्हा नवनीत राणा ‘सी’ ग्रेड चित्रपटात व्यस्त होत्या”

दरम्यान, यावर बोलताना शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनीदेखील नवनीत राणांवर अशाच प्रकारची टीका केली होती. “तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत. बाळासाहेबांचे राहिले नाहीत. मात्र, याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लीम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदाही केला होता. हे तुमच्यासारख्या ‘मुंबईची मुलगी’ म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी ‘सी’ ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळले आहे”, असं संजना घाडी म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishori pednekar slams navneet rana in c gread movies targeting uddhav thackeray pmw