लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर: मकर संक्रांत, दीपावली आणि इतर धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांशी पतंग उडविण्याची परंपरा जोडली गेली आहे. सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी दीपावलीच्या पर्वावर पतंगबाजी होते. परंतु याच जिल्ह्यातील करमाळा शहरात श्रावण महिन्यात नाग पंचमी सणामध्ये पतंगबाजीची परंपरा चालत आली आहे. सोमवारी नागपंचमीच्या दिवशी करमाळ्यात पतंग उडविण्याची जणू स्पर्धाच पाहायला मिळाली. दिवसभर सर्वांच्या नजरा आकाशात चढाओढीने उंच उडणा-या पतंगांकडे खिळून राहिल्या होत्या. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच पतंगबाजीचा आनंद लुटला.
नाग पंचमीचा सण प्रामुख्याने महिलांचा असतो. आदल्या दिवशी भावाच्या नावाने उपवास केल्यानंतर दुस-या दिवशी नाग पंचमीला महिला नटून थटून नागोबाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. ग्रामीण भागात नागोबाच्या वेरूळाचे पूजन केले जाते. यात पुरूष मंडळींचा सहभाग तुलनेने अत्यल्प असतो. करमाळा भागात नाग पंचमी सणाचा आनंद लुटण्यात महिलांच्या बरोबरीने पतंगबाजीच्या निमित्ताने पुरूषांचाही सहभाग असतो. यंदा अधिक महिना सरताच करमाळ्यात सर्वांनाच नाग पंचमीचे वेध लागले होते. दोन-तीन दिवस अगोदर शालेय मुले आणि तरूणांनी पतंगबाजीच्या तयारीला लागले होते. यानिमित्ताने पतंग, मांजा आणि आसारी (भिंगरी) विक्रीसाठी बाजारपेठ फुलून गेली होती. सुमारे ५० लाख लोकसंख्येच्या करमाळा शहरात पतंग बाजारात काही लाख रूपयांची उलाढाल झाली. पतंग, मांजा व इतर साहित्य प्रामुख्याने गुजरातमधून मागविले जाते.
हेही वाचा… २४९ कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती
नाग पंचमीच्या सकाळपासूनच पतंग उडविण्याचा उत्सव सुरू झाला. बहुमजली इमारतींसह घरांच्या गच्चीवर चढून तसेच मोकळ्या मैदानावर पतंग उडविण्यासाठी मुले व तरूणांसह प्रौढांची रेलचेल दिसून आली. काही सार्वजनिक मंडळांनी पतंग उडविताना डीजेसारख्या ध्वनिक्षेपण यंत्रणांचा दणदणाट केला. लहान मुलांनी पिपाण्या वाजवून गोंगाट चालविला होता. तर बरीच उत्साही तरूण मुले पतंग उडविताना डोळ्यांवर ऐटीत खास गॉगल वापरून मजा लुटत होते. उंचावर गेलेल्या पतंगांची चढाओढ लागत असताना त्यांच्यात एकमेकांची कापाकापी करण्याचीही स्पर्धा वाढली होती. कापलेला पतंग हेलकावे खात दूर जाऊन कोसळत असताना तुटलेला मांजा लुटण्यासाठी मुलांची धावपळ सुरू होती. पतंगांसाठी वापरला जाणारा मांजा नायलॉनचा नसावा, असा कायदेशीर दंडक आहे. परंतु कायद्याचे उल्लंघन करून नायलॉनचा मांजा वापरला जात होता.
हेही वाचा… १० ड्रोन कॅमेरे, गस्ती पथके… ; चोख बंदोबस्तात शिराळ्यात प्रतीकात्मक नागपूजा
पतंगासाठी वापरला जाणारा मांजा सध्या तयार स्वरूपात मिळतो. नागपंचमीच्या पूर्वी काही दिवसांपासून हाताने मांजा तयार केला जात असे. लाल, गुलाबी किंवा अन्य रंगांचा वापर मांजा तयार करण्यासाठी करताना त्यात सोडा वॉटरच्या बाटल्यांची काच वापरली जात असे. चिकट सरस वितळवून मांजा तयार करताना काचेची भुकटी मांजाला लावली जात असे. यात प्रचंड आकाराच्या पतंगांसह लुगदी मांजा, सहसा न कापला जाणारा चिवट मांजा वापरला जायचा. आता तो काळ इतिहास जमा झाल्याची खंत वृध्द मंडळी जुन्या आठवणींना उजाळा देताना बोलून दाखवितात.