राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मिटकरी हे एकनाथ शिंदे यांच्या पाया पडताना दिसत आहे. संबंधित व्हिडीओ शेअर करत मिटकरी यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जवळचे संबंध असल्याचा दावा सोशल मीडियात केला जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, “मी वारकरी संप्रदायाचा आहे. त्यामध्ये एकमेकांच्या पाया पडण्याची परंपरा आहे. एकनाथ शिंदेसाहेब हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते वडिलकीच्या नात्याने मोठे आहेत. पण भाजपाचा आयटी सेल आणि काही लावारिस कार्टी माझा २३ मार्च २०२२ चा जुना व्हिडीओ व्हायरल करत आहेत. त्यांना एकच सांगू इच्छितो की, माझ्या वडिलांनी आणि वारकरी संप्रदायाने मला पाया पडण्याचे संस्कार दिले आहेत. त्यामुळे मी कुणाच्या पाया पडलोय, हे महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळी नगरविकासमंत्री होते. आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते माझ्यासाठी शेवटपर्यंत वंदनीय आहेत.”

हेही वाचा- “अजित पवारांसमोरची तुमची केविलवाणी अवस्था मी पाहिली आहे”, अमोल मिटकरींचं दीपक केसरकरांवर टीकास्त्र!

पुढे त्यांनी सांगितलं, “उद्या नरेंद्र मोदी मला दिसले तर मी त्यांच्याही पाया पडेन. नरेंद्र मोदींना जेव्हा पवारसाहेब दिसतात, तेव्हा ते पवारसाहेबांच्या पाया पडतात. याचा अर्थ कोण मोठं किंवा कोण लहान असा होत नाही. पण काही लावारिस कार्ट्यांना माझ्याविरुद्ध बोलायला काहीतरी हवं असतं. शिंदेसाहेब हे वडिलकीच्या नात्याने नेहमीच वंदनीय आहेत. त्यामुळे आता जो व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यातून भाजपा आयटी सेलवाले माझी मुख्यमंत्र्यांसोबत अतिशय जवळीक आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. संबंधित व्हिडीओ ३ ते ४ महिने जुना असून तो आता व्हायरल होत आहे. त्यामुळे यावर काही स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत नाही” असंही मिटकरी यावेळी म्हणाले.