जुन्या वादाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात बोलविण्यात आलेल्या एकाने दुसर्‍यावर अचानक चाकू हल्ला केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर झालेल्या या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. लखन भागवत माने (वय ४०) रा. हजारमाची (ता.कराड)  असे या चाकू हल्ला करणार्‍याचे, तर किशोर पांडुरंग शिखरे (वय २७) रा. हजारमाची (ता.कराड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

किशोर शिखरे याच्या वडिलांबरोर लखन माने याचे भांडण झाले होते. वारंवार समजावून सांगूनही लखन माने किशोरच्या वडिलांना फोनवरून धमकी देत होता. त्यामुळे याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अधिक चौकशी करण्यासाठी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी.आर. पाटील यांच्या केबिनमध्ये दोघे एकमेकासमोर आल्यानंतर अचानक हा प्रकार घडला.

कराड शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक बी.आर.पाटील यांच्या समोरच अचानक लखन माने याने किशोर शिखरे याच्या पाठ, मान व हातावर चाकूने तीन वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यातील वार शिखरे याच्या वर्मी लागल्याने तो जखमी झाला आहे. वेळीच पोलिसांनी त्याला थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी जखमी किशोर शिखरे याला तत्काळ  रुग्णालयात हलवले. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर लखन माने याला ताब्यात घेतले असून जखमीच्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Story img Loader