महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं निधन झालं. मनोहर जोशी यांची कारकीर्द कशी होती यावर आपण एक नजर टाकू.
संघर्षमय आयुष्य
मनोहर जोशींचे वडील भिक्षुकी करायचे. त्यानंतर मनोहर जोशीही भिक्षुकी करु लागले. एक काळ असाही होता की ते माधुकरी मागून जेवत असत. मात्र शिकण्याची जिद्द प्रचंड होती. त्यामुळे मनोहर जोशी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकले आणि शिक्षक झाले. कमवा आणि शिका या तंत्राने ते लहानपणापासून संघर्ष करत होते. मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ या दिवशी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करुन त्यांनी शिक्षण घेतलं. किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली. वयाच्या २७ व्या वर्षी मनोहर जोशी ते एम. ए. एल. एल. बी झाले. त्यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते.
ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिलेला नेता
२ डिसेंबर १९६१ ला त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेसमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा यामागचा त्यांचा उद्देश होता. १९६७ मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले ते कायमचेच. मनोहर जोशी यांनी ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिल्या आहेत. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे.
शिवसेनेत आल्यानंतर मनोहर जोशींची कारकीर्द झळाळली
शिवसेनेत आल्यानंतर त्यांची कारकीर्द झळाळली. भिक्षुक ते महापौर हा त्यांचा प्रवास सुरुवातीला राहिला. त्यानंतर युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष हे पदही भूषवलं त्याचप्रमाणे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री हे पदही त्यांनी भुषवलं. एका गरीब घरातून आलेला मुलगा अशा प्रकारे विविध पदांवर कार्यरत राहिला ते केवळ आपल्या शिक्षणाच्या आणि तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर. राजकारण करण्यापेक्षाही त्यांचा समाजकारणावर भर जास्त होता. बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत या नावाने हाक मारत असत.
शिवसेनेत कसे आले मनोहर जोशी?
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणात आले. फक्त आलेच नाहीत तर ते तिथे खूप मोठेही झाले. मनोहर जोशी यांनी मागे वळून पाहिलं नाही. १९६४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. कोणताही राजकीय विचार नसताना, राजकारणात येण्याचा विचार नसताना ते शिवसेनेत आले. १९६६ ला शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांची साधी ओळखही नव्हती. १९६७ च्या डिसेंबर महिन्यात बाळासाहेब ठाकरेंची पुण्यात सभा होती. त्यावेळी श्रीकांत ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची भाषणं रेकॉर्ड करत असत. मुंबईत रेकॉर्ड सिस्टीमची जमवाजमवी केली आणि पुण्याला जाण्याची तयारी केली. घरातली कार बाळासाहेब ठाकरे हे आधीच पुण्याला घेऊन गेले होते. आता रेकॉर्डिंगची सगळी तयारी बस किंवा ट्रेनमधून कशी नेणार? त्यावेळी यशवंत पाध्ये यांनी मनोहर जोशींना शब्द टाकला. मनोहर जोशींनी कुठलेही आढेवेढे न घेता होकार दिला. मनोहर जोशी हे आपल्या कारमधून रेकॉर्डिंगचं सगळं सामान आणि श्रीकांत ठाकरेंना घेऊन पुण्यात पोहचले. पुण्यातली सभा झाल्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट शनिवार वाडा परिसरात घडवून आणली. त्यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मनोहर जोशी शिवसेनेत आले.
हे पण वाचा- माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
राडा करणाऱ्या शिवसैनिकांच्या गराड्यात मनोहर जोशी यांचा सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा शिवसैनिक म्हणून मिळाला. त्यामुळेच त्यांच्याकडे महापौरपद आलं, मुख्यमंत्रीपद आलं, तसंच मानाची जवळपास सगळी पदं भुषवली.
राजकीय क्षेत्रांत जोशी सरांनी भूषवलेली पदं
नगरसेवक (२ टर्म)
विधानपरिषद सदस्य (३ टर्म)
मुंबईचे महापौर (१९७६ ते १९७७)
विधानसभा सदस्य (दोन टर्म्स)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – १९९५ ते १९९९
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (१९९९ ते २००२)
लोकसभा अध्यक्ष (२००२ ते २००४)
राज्यसभेचे खासदार (२००६ ते २०१२)