चंद्रपुरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांच्या नाकी नऊ आणले. मात्र, अखेर पोलिसांनी या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी अटक केलेल्या टोळीत एका तरुणीचाही समावेश असल्याचं आढळलं. मात्र, ही तरुणी सामान्य तरुणी नसून चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसची (Chandrapur NCP) पदाधिकारी निघाली. वैष्णवी देवतळे (Vaishnavi Devtale) असं या आरोपी तरुणीचं नाव आहे. या प्रकाराने चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
नेमकं काय घडलं?
चंद्रपुरात वाढत्या दुचाकी चोरीची प्रकरणं वाढल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. यावेळी पोलिसांना एक व्यक्ती काळ्या रंगाची दुचाकी विकण्यासाठी ग्राहकाचा शोध घेत असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला अटक केली. याचा अधिक तपास केला असता संबंधित दुचाकी चोरीची असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने त्याच्या साथीदारांसह तब्बल ११ दुचाकी चोरल्याचीह कबुली दिली.
चोरीची अनोखी शक्कल
चोरांनी दुचाकी चोरीची अनोखी शक्कल लढवली. राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असलेली तरुणी आपल्या दोन सहकाऱ्यांसह या चोऱ्या करत होती. सर्वात आधी ही टोळी विना लॉक असलेल्या दुचारी हेरायची. त्या गाडीवर आणि चालकावर लक्ष ठेऊन संधी मिळताच आरोपी तरुणी ही गाडी लोटत दूर न्यायचे. तिला तिचा एक साथीदार गाडी लोटण्यासाठी मदत करायचा. यावेळी गाडीची नंबर प्लेट देखील बदलली जायची.
गाडी विर्जनस्थळी नेल्यानंतर त्यांचा तिसरा साथी गाडीची नकली चावी तयार करून गाडी चालू करायचे आणि मग ही गाडी लपून ठेवली जायची. चोरी केलेल्या महागड्या गाड्या पैशांसाठी अगदी कमी किमतीत विकल्या जायच्या. यासाठी योग्य ग्राहकांचा शोध घेतला जायचा.
आरोपींकडून ११ दुचाकींसह ६ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून तब्बल ११ दुचाकींसह एकूण ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील ५ दुचाकी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतून, ३ दुचाकी चंद्रपूर शहर हद्दीतून, १ दुचाकी बल्लारशाह परिसरातून आणि २ दुचाकी इतर ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आल्यात.
आरोपी तरुणीचं राष्ट्रवादीकडून महिन्यापूर्वीच निलंबन
दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी आरोपी तरुणीचं महिनाभरापूर्वीच निलंबन केल्याचा दावा केलाय. मात्र, या तरुणीच्या फेसबुकवर अजूनही ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदावर असल्याचा उल्लेख आहे.