शिवसेना नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला भगदाड पाडलंय. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी २/३ आमदारांचा आपल्याकडे पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे आघाडीच्या नेत्यांनी मात्र आपलं सरकार स्थिर असल्याचा दावा केलाय. असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार याच्याच चर्चा रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाचा हा खास आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांना त्यांचं मूळ गाव दरे येथून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. या गावात केवळ ३० कुटुंबं आहेत. कोयना नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे गाव प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर येथून ७० किमी आहे. या गावाच्या एका बाजूला जंगल आहे, तर दुसऱ्या बाजूला कोयना आहे. या गावात उत्पन्नाचं कोणतंही शाश्वत साधन नसल्याने बहुतांश लोक मुंबई आणि पुण्यात स्थलांतरीत झाले आहेत.

मागील काही वर्षांपासून एकनाथ शिंदे यांनी आपल्या मूळ गावाकडे म्हणजे दरेकडे लक्ष देण्यास सुरुवात केलीय. एकनाथ शिंदे लहान असतानाच त्यांच्या वडिलांनी कामाच्या शोधात दरे गाव सोडलं आणि ते ठाण्याला स्थलांतरीत झाले. एवढ्यात शिंदे यांच्या कुटुंबाने गावातील वार्षिक धार्मिक उत्सवाला आवर्जून हजेरी लावली आहे, अशी माहिती गावचे सरपंच लक्ष्मण शिंदे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या गावातील सर्वजण एकनाथ शिंदे यांना टीव्हीवर पाहत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी मागील काही काळात आपलं मूळ गाव असलेल्या दरेमध्ये काही विकासात्मक कामं सुरू केल्याचंही सरपंच शिंदे यांनी सांगितलं. तसेच आमचं गाव एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित असल्याची भावनाही लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केली.

दरे गावात ना शाळा, ना रुग्णालय

राज्याच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी विकासाच्या राजकारणाचे अनेक दावे केले आहेत. असं असलं तरी त्यांच्या मूळ गाव असलेल्या दरेमध्ये ना शाळा आहे, ना रुग्णालय. शिक्षण किंवा आरोग्य या सुविधांसाठी गावातील नागरिकांना ५० किमी अंतरावरील तपोला येथे जावे लागते. बोटीतून प्रवास केल्यास हे ५० किमीचं अंतर १० किमी होतं. तपोला कोयना नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर आहे.

विशेष म्हणजे दरे गावात शाळा, रुग्णालय नसले तरी एकनाथ शिंदे कायम हेलिकॉप्टरने येत असल्याने गावात दोन हेलिपॅड आहेत. एक हेलिपॅड गावात आहे, तर दुसरं शिंदे यांच्या गावातील घराजवळ आहे. ते लवकरच कार्यान्वित होणार आहे.

सनी शिंदे नावाच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याने सांगितलं, “शाळा उघडल्या आहेत, मात्र नदी आटल्याने आम्हाला जाता येत नाही. नदीचं पात्र खूप रुंद आहे, बोटीशिवाय नदी पार करता येत नाही. त्यामुळे नदीला पाणी नसताना नदीच्या या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीपासून कायम सवलत दिली जाते. कारण तपोला येथे असलेल्या शाळेत रस्ता मार्गे जायचं ठरलं तर ५० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यात गावात एका दिवसात एकच बस येते. त्यामुळे अशा काळात केवळ दहावीचे विद्यार्थी बसने प्रवास करत शाळेत जातात. इतर विद्यार्थ्यांची शाळा नदीला पाणी आल्यावर म्हणजे साधारणतः १५ ऑगस्टपासून सुरू होते.”

हेही वाचा : बंडखोर आमदारांचा पंचतारांकित हॉटेलचा खर्च कोण करतंय? दीपक केसरकर म्हणाले, “आम्ही भाजपाशी बोलतोय, पण…”

२०१९ च्या निवडणुकीत जाहीर केल्याप्रमाणे एकनाथ शिंदे याची गावात १२.४५ एकर शेतजमीन आहे. त्या जमिनीची किंमत २१.२१ लाख आहे. तर मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावर नोव्हेंबर २०१७ मध्ये गावातील २२.६८ एकर जमीन होती. त्याची किंमत २६.५१ लाख रुपये आहे.