राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका केली. त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच नव्या संसदेला विरोध म्हणजे विरोधकांची पोटदुखी आहे, अशी टीका केली. मात्र, यावेळी भाषण करताना ते अचानक थांबले आणि मंचासमोरील एका व्यक्तीला “काय रे बाबा, मी आता भाषण बंद करतो”, असं म्हणाले. ते शुक्रवारी (२६ मे) औरंगाबादमधील कन्नड येथे शासन तुमच्या दारी अंतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “आपल्या संसद भवनाचं उद्घाटन करायचं आहे. याला विरोध केला जातो आहे. संसद भवन हे पवित्र मंदिर आहे. तिथं सगळे खासदार बसतात, लोकांना न्याय देतात. प्रश्न मांडतात. मोदींनी २०१९ मध्ये जे स्वप्न पाहिलं ते २०२३ ला पूर्ण करण्याचं काम केलं. हे ऐतिहासिक काम आहे. त्याला काय विरोध करता. ही पोटदुखी आहे, हा पोटसूळ आहे.”
“काय रे बाबा, मी आता भाषण बंद करतो”
हे बोलत असतानाच एकनाथ शिंदेंच्या भाषणा दरम्यान मंचासमोर एका श्रोत्याने काहिसा गोंधळ केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे “काय रे बाबा, मी आता भाषण बंद करतो” असं म्हणत हसले आणि त्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.
व्हिडीओ पाहा :
“मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांना पोटदुखी”
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “एवढं मोठं काम कमी वेळात झालं. त्यामुळे याचं मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांना पोटदुखी होत आहे. याआधी राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनीही अशी उद्घाटनं केली. तेव्हा कुणीही विरोध केला नाही. कारण हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे.”
अरविंद केजरीवालांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर एकनाथ शिंदेंची टीका
शिंदेंनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या इतर नेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “अरविंद केजरीवाल मुंबईत येतात, एकाला भेटतात, दुसऱ्याला भेटतात, दुसरा तिसऱ्याच्या दारी जातो. चौथा पाचव्याच्या दारी जातो आहे. हे केवळ मोदी सरकारच्या कामाला घाबरून केलं जातंय. मात्र, आपण कुणाच्याही दारी जात नाही, तर आपलं शासन या सर्वसामान्यांच्या दारी येतंय. हा फरक आहे. आम्ही मागायला नाही, तर द्यायला सर्वसामान्यांच्या दारी जातो आहे.”
“…म्हणून लोक आमच्याकडे येतात”
“हे कितीही एकत्र आले तरी या देशातील जनता सुज्ञ आहे. अडीच वर्षे घरात बसलेल्यांच्या मागे उभे राहायचे की रस्त्यावर उतरून लोकांच्या दारी जाणाऱ्यांच्या मागे उभे राहणार हे जनतेला सांगण्याची गरज नाही. जनता सुज्ञ आहे. आम्ही २४ तास जमिनीवर काम करणारे लोक आहोत. आम्हाला लोकांमध्ये राहायला आवडतं. म्हणून लोक आमच्याकडे येतात,” असं एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.