प्रगत व पुरोगामी महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीतही देशात अग्रस्थानी येण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून, प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानाधिष्ठित समाज व अर्थव्यवस्था निर्माण करुन बौद्धिक क्षमतेवर विकास साधायचा असेल, तर गुणवत्ताच देशाला तारु शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केले.
राज्यातील आदर्श शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्य पुरस्कार प्रदान समारंभ मार्केट यार्ड येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरात झाला. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. यावेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, महापौर प्रतिभा नाईकनवरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजयसिंह मंडलिक यांची उपस्थिती होती.
जगात नेतृत्वस्थानी जायचे असेल, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाला पर्याय नाही. त्यासाठी गणित आणि इंग्रजीमध्ये नैपुण्य प्राप्त करणे आवश्यक असल्याचे सांगून चव्हाण यांनी समाजातील बदल स्वीकारुन देशासमोरील आव्हाने पेलत भारताला महासत्ता बनविण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. यासाठी शिक्षकांनी संगणक साक्षर झाले पाहिजे. हाताच्या बोटावर असणाऱ्या वैश्विक ज्ञानाचा, माहितीचा लाभ घेऊन स्वयं गुणवत्ता वाढविली पाहिजे, असे सांगितले.
आज इंजिनियरिंगच्या ४० टक्के, मॅनेजमेंटच्या ६० टक्के जागा रिक्त राहत आहेत, याला जबाबदार कोण आहे, याचे आत्मपरीक्षण होण्याची गरज व्यक्त करुन चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मानवी विकास अहवालातून अचूक तुलनात्मक अभ्यास होण्यासाठी शिक्षण विभागाने संख्या शास्त्रज्ञांची मदत घ्यावी व ठोस निष्कर्षावर आधारित गुणवत्ता वाढीसाठी नियोजन करावे, असे सांगितले.
दारिद्रय निरक्षरता, आरोग्य, निवारा, कोरडवाहू शेती, पर्यावरणातील बदलामुळे येणारी संकटे, समान औद्योगिकीकरण अशी सर्व आव्हाने पेलण्यासाठी विकास दर दोन अंकी असला पाहिजे, असे सांगून चव्हाण यांनी कुशल मनुष्यबळ व बौद्धिक संपदा यांच्या आधारे विकास साधणाऱ्या जपान, इस्रायल, दक्षिण कोरिया सारख्या देशांचा आदर्श घेऊन पदवी, उच्चशिक्षण या क्षेत्रात आपण या देशांच्या तुलनेत कुठे आहोत याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज व्यक्त केली.
गुणवत्ताच देशाला तारू शकते – मुख्यमंत्री
प्रगत व पुरोगामी महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीतही देशात अग्रस्थानी येण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून, प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
First published on: 05-09-2013 at 05:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Knowledge based society will be key factor in nation development saya prithviraj chavan