मान्सूनच्या पावसाने सिंधुदुर्ग-रत्नागिरीसह कोकणचा बराचसा भाग व्यापल्याचे हवामान खात्याने घोषित केले असले तरी प्रत्यक्षात कोकणाला अजूनही मान्सूनची प्रतीक्षाच आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यंदा मान्सूनचा पाऊस केरळात वेळेवर पोचला आणि त्यापाठोपाठ कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागांत त्याने आगेकूच केल्याचे सांगितले जात आहे. पण गेल्या दोन दिवसांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये ढगाळ हवामान वगळता पावसाचा फारसा शिडकावासुद्धा झालेला नाही. काही ठिकाणी विस्कळीत स्वरूपाच्या एक-दोन जोरदार सरी वगळता मान्सूनपूर्व पावसानेही अजून कोकणात फारशी हजेरी लावलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्य़ात गेल्या १ जूनपासून आजअखेर फक्त एकूण सरासरी ३८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.  
गेल्या काही वर्षांपासून कोकणात वळवाच्या जोरदार सरी पडणे जवळजवळ बंद झाले आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात वातावरण ढगाळ होऊ लागते आणि साधारणपणे १० ते १२ जूनच्या दरम्यान थेट मान्सूनचा पाऊस पडायला लागतो. सध्याचे हवामान लक्षात घेता यंदाही कोकणात याच सुमारास मान्सूनचे खऱ्या अर्थाने आगमन होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, येत्या शनिवार-रविवारी पावसाचा जोर वाढेल आणि कोकणात मान्सून स्थिरावेल अशी अपेक्षा आहे.