कोकणातील आंबा पिकाला आता विम्याचे संरक्षण प्राप्त होणार आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत आता आंबा पिकाचा समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागाने याबाबतचा अध्यादेश १२ डिसेंबरला जारी केला आहे. या योजनेनुसार आंबा बागायतदारांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळू शकणार आहे.
राज्यातील द्राक्ष, केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब आणि काजू यांना फळपीक विमा योजनेचे संरक्षण यापूर्वी देण्यात आले होते. आता मात्र आंबा पिकाचाही या योजनेत समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अवकाळी पाऊस आणि तापमानातील चढउतारापासून आंब्याला फळपीक योजनेचे संरक्षण देणे आणि शेतक ऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्य़ांसह राज्यातील १६ जिल्ह्य़ांत ही फळपीक विमा योजना राबवली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत आंबा बागायतदारांना प्रतिहेक्टरी एक लाखाचे विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी एकूण १२ हजारांचा विमा हप्ता द्यावा लागणार आहे. मात्र यातील पन्नास टक्के रक्कम ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनुदानातून जमा होणार आहे. त्यामुळे बागायतदारांना विमा संरक्षणासाठी केवळ ६००० रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. सर्व राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये विम्याचा हप्ता ३१ डिसेंबरपूर्वी भरता येणार आहे.
कोकणातील चार जिल्ह्य़ांमध्ये दोन टप्प्यांत ही योजना लागू केली जाणार आहे. यात समुद्र किनाऱ्यापासून १५ किलोमीटरच्या आत असलेल्या परिसरातील आंबाबागांसाठी एक आणि समुद्रकिनाऱ्यापासून १५ किलोमीटरच्या बाहेरील आंबाबागांसाठी एक असे वर्गीकरण केले जाणार आहे.
आंबा हंगामातील हवामानातील बदल हे आंब्यासाठी नेहमीच घातक ठरत असतात. ऐन हंगामात कधी कमी तापमानामुळे, तर कधी जास्त तापमानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होत असतो. याशिवाय अवेळी आलेल्या पावसामुळेही पिकाचे मोठे नुकसान होत असते. यामुळे हवामान बदलांतील धोके लक्षात घेऊन आता ही विमा योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी कोकणातील काही तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात आली होती. यात रायगडमधील १२३ बागायतदारांनी या विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यांना २३ लाख ८५ हजारांची फळपीक विमा रक्कम मिळाली होती. शेतक ऱ्यांचे हित लक्षात घेऊन संपूर्ण कोकणात ही फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी विभागाने घेतला.
फळपीक योजनेनुसार प्रत्येक बागायतदारांना प्रत्येक झाडासाठी ६० रुपये एवढी अत्यल्प रक्कम भरावी लागणार आहे, त्यामुळे जास्तीतजास्त बागायतदारांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे मत रायगडचे कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी सांगितले. फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन माने यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा