कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरण भूसंपादन करताना पुरेसा मोबदला मिळाला नाही, आधी भूसंपादन झालेल्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही आदी कारणावरून गडमुडशिंगी येथे शासकीय बैठकीवेळी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. एका ग्रामस्थाने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
उजळाईवाडी (कोल्हापूर) विमानतळासाठी भूसंपादनाच्या अडचणी बाबत अनेकदा बैठका घेऊन देखील प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही झालेली नाही. या विषयावर आज ग्रामपंचायतीमध्ये मंडल अधिकारी आदित्य दाभाडे, ग्राम महसूल अधिकारी अनिकेत गुरव, ग्राम महसूल अधिकारी सागर पाटील, ग्रामविकास अधिकारी आर. आर. चौगुले यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाच…सोलापुरात दोघा व्यापारी बंधूंनी १०.८३ कोटींचा जीएसटी बुडविला, जीएसटी विभागाकडून अटकेची कारवाई…न
स्थानिक अधिकाऱ्यांनी सायंकाळी प्रांताधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीवेळी म्हणणे मांडावे असे सांगितले. त्याला विरोध करत प्रांताधिकारी यांनी गावात यावे, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी मंडलाधिकारी यांना धारेवर धरले. यावेळी एका संतप्त ग्रामस्थाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी त्याच्याकडून डिझेलचे कॅन काढून घेतले.
गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सरपंच अश्विनी शिरगाव यांनी प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांना ग्रामस्थांच्या संतप्त भावना मोबाइलद्वारे कळवल्या. त्यानंतर नायब तहसीलदार ऋतुराज निकम यांनी गावात येऊन नागरिकांची समजूत काढली.
v