पुणे-बेंगळरू राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळील तवंदी घाटात कार आणि ट्रकचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आज शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता हा अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, बेळगावहून मुंबईकडे जाणार्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटला. ट्रक विरुद्ध बाजूला जाऊन बेळगावकडे निघालेल्या कारवर उलटला. अपघातानंतर सुमारे दोनशे फूट कार फरपटत गेली. दुर्देवाची गोष्ट म्हणजे मृत्यू झालेले सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. सर्व मृत कागल तालुक्यातील मुरगूड येथील रहवाशी आहे. मृतांमध्ये एका बालकासह चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. लावर जमादार, रेहाना जमादार, जुनेद खान जमादार, आफरिन जमादार आणि आयान जमादार अशी मृतांची नावे आहेत.
सोशल मीडियावरून या अपघाताची बातमी कळताच मुरगूड शहरावर शोककळा पसरली आहे.अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटत नव्हती. गाडीच्या बाहेर सापडलेल्या ओळख पत्रावरून सर्वांची ओळख पटली. ट्रकमधील जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.