राज्य शासनाच्यावतीने येथे आयोजित राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरने आपले वर्चस्व सिद्ध केले. पुरुषांच्या फ्री स्टाईल आणि ग्रीको रोमन त्याचप्रमाणे महिला या तीनही गटांतील सर्वसाधारण विजेतेपदाचा मान कोल्हापूरला मिळाला.
ग्रीको रोमन पुरुष गटात कोल्हापूर जिल्हा प्रथम, कोल्हापूर शहर द्वितीय तर सोलापूर शहर संघ तृतीय क्रमांकावर राहिला. पुरुष फ्री स्टाईल गटात कोल्हापूर जिल्हा प्रथम, सोलापूर जिल्हा द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय राहिला. महिला फ्री स्टाईल गटातील सर्वसाधारण विजेते पदातील पहिल्या क्रमांकावर कोल्हापूर तर द्वितीय क्रमांकावर सोलापूर तसेच तिसऱ्या क्रमांकावर अकोला संघ राहिला.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धा समितीचे स्वागताध्यक्ष आमदार कैलास गोरंटय़ाल, जिल्हा परिषद अध्यक्षा आशाताई भुतेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष किसनलाल भगत, सचिव डॉ. दयानंद भक्त यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती या वेळी होती.

Story img Loader