कोरोना रुग्णाच्या अलगीकरण मुद्दावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी मुरगुड नगर पालिका मुख्याधिकाऱ्यावर चप्पल फेक केली. या घटनेवरून मुरगुड मधील वातावरण तापले असून मुरगुड  पालिका कार्यालयात एकच गोंधळ उडाला आहे. यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये गुरुवारी करोना रुग्णांवरुन प्रचंड गोंधळ झाला. शहरात काल (बुधवार) सापडलेला पहिला करोनाबाधित 20 वर्षीय रुग्ण हा प्रशासनाने कागदोपत्री संस्थात्मक अलगीकरण कक्षात असल्याचे दाखवले असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र हा रुग्ण केवळ एकच दिवस कन्या विद्यामंदिर या शाळेमध्ये अलगीकरणात होता, याचे पुरावे देत नागरिकांनी आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना पालिकेत जाऊन घेराव घातला.

थोड्यावेळातच या ठिकाणी प्रचंड गोंधळ सुरु झाला. दरम्यान संतप्त नागरिकांनी पालिकेतील काही बॅनर फाडून भिरकावले. पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करत संपूर्ण पालिका, स्वच्छता कर्मचारी यांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. कारण पहिला रुग्ण हा पालिकेचा आरोग्य ठेकेदाराचा नातेवाईक असून तो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला होता.

यावेळी घोषणाबाजी करत नागरिकांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यावर चप्पल फेक करण्यात आली,  सुदैवाने  यामधून ते बचावले मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका नगरसेवक याचे लक्ष झाला. संतप्त नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी निवेदन स्वीकारावे अशी मागणी केली.सदर रुग्णाला पाठीशी घालून त्याला घरी दडवणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार? याचा जाब लोकांनी विचारला. त्याचे उत्तर नगराध्यक्षानी समोर येऊन द्यावे, अशी मागणीही केली. हा गोंधळ बराच काळ सुरू राहिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur angry citizens throw slippers at murgud municipal chief msr