कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. शिवाय, काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या सभेवरून व त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले. तसेच, “जे आता बेंबीच्या देठापासून ओरडताय की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं, कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे काय हिंदुत्व नाही सोडलं. तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही.” असं यावेळी म्हणत हिंदुत्वाच्या मुद्य्यावरून मुख्यमंत्र्यांनी भाजपावर निशाणा देखील साधला.
राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर… –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो. अशी सभा घेण्याची माझी सवय नाही, कारण आपण समोरा-समोर लढणारे मर्द आहोत. कोल्हापूर ही तर मर्दांची भूमी आहे. कालच आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेला आहे. मला स्वत:ला अभिमान आहे, की पृथ्वीराजच्या रूपाने २१ वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पृथ्वीराजचं मी मनापासून अभिनंदन करतोच आहे, पण लढायचं कसं आणि ते सुद्धा मर्दाने लढायचं कसं हे या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. तरी नशीब ही निवडणूक आहे, राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोरासमोर लढणारा मर्द कुणी नाहीए, पण कुस्तीमध्ये जर भाजपा उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल. सीबीआय, ईडी इत्यादींची धाड आणि मग स्वत:मध्ये धमक काही नसताना, मी जे बोललो होतो की मर्दाने मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दाने कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे.”
स्वत:च्या कर्तृत्वाचं सांगण्यासारखं काही नसल्याने द्वेष पसरवणारे मुद्दे पुढे करायचे आणि… –
तसेच, “कोल्हापूर हे काय माझ्यासाठी नवीन नाही. माझे आजोबा आणि राजर्षि शाहू महाराज यांचे ऋणानूबंध काय होते हे वेळोवेळी मी देखील सांगितलं आहे आणि शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे आपली एक नाळ जोडलेली आहे. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. हे काल जे कोणी येऊन गेले, मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ही सभा नक्कीच घेतलेली नाही. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे काही बोलायचे मुद्दे नसले, की मग विरोधकांवर खोटे आरोप करायचे, एक भ्रम निर्माण करायचा आणि आपलं कुठे काही घोडं पुढे सरकतं का हे बघायचं. ही यांची एक वाईट सवय झाली आहे. स्वत:च्या कर्तृत्वाचं सांगण्यासारखं काही नसल्याने द्वेष पसरवणारे मुद्दे पुढे करायचे आणि आपलं इप्सित साध्य करायचं.” असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
आम्ही उघडपणे सगळं करत आहोत, लपूनछपून नाही –
याचबरोबर, “मी सर्वात अगोदर आपण जे काही केलं आहे हे मुद्दाम सांगतो, हे का सांगावं लागतय कारण निवडणूक म्हटल्यानंतर एक वेगळा असा माहोल तयार होतो आणि अनेकदा आपल्याला असं वाटतं की जे खोटं रेटून बोलत आहेत, ते रेटून बोलत असल्यामुळेच ते खरंय की काय? मध्यंतरी आपल्या आमदारांची बैठक छगन भुजबळ यांच्या घरी झाली होती आणि तिथे मी बोललो होतो की महाविकास आघाडी यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहेच. आम्ही उघडपणे सगळं करत आहोत, लपूनछपून नाही. आम्ही कमी कुठे पडतो? कामात पडतोय का, तर अजिबातच नाही. आपत्ती आली तर धावून जायला कमी पडतोय का? अजिबातच नाही. सरकार म्हणून प्रशासकीय गोष्टींमध्येही कमी पडत नाही. तरी कमी कुठं पडतो तर खोटं बोलण्यात कमी पडतो. पण आम्ही खोटं बोलणारच नाही. कमी पडलो तरी चालेल पण आम्ही शिवरायांचे मावळे स्वत:ला समजत असल्याने खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही.” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं.