Kolhapur Chandgad Newly Elected MLA Public Rally fire Incident : चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान आगीचा भडका उडाल्याची घटना घडली आहे. शिवाजी पाटील या आगीपासून थोडक्यात बचावल्यांचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. मात्र आगीच्या भडक्यात काही महिला होरपळल्या आहेत. शिवाजी पाटलांच्या विजयी मिरवणुकीवेळी त्यांच्या अंगावर व कार्यकर्त्यांवर जेसीबीने गुलाल उधळला जात होता. याच वेळी तिथे काही महिला शिवाजी पाटलांचं औक्षण करण्यासाठी जमल्या होत्या. औक्षण करतेवेळी जेसीबीने गुलाल उधळळा जात होता. त्याचवेळी आगीचा भडका उडाला. या आगीपासून शिवाजी पाटील थोडक्यात बचावले. मात्र, काही महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी महागाव येथे मोठी मिरवणूक काढली. शिवाजी पाटील या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ते त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर जल्लोष करत होते. तसेच या मिरवणुकीच्या ठिकाणी काही महिला त्यांचं औक्षण करण्यासाठी जमल्या होत्या. मिरवणुकीच्या ठिकाणी, शिवाजी पाटलांच्या अंगावर व नाचून जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जेसीबीने गुलाल उधळला जात होता. मात्र, गुलाल औक्षणाच्या ताटातल्या दिव्याच्या संपर्कात आल्यावर मोठा भडका उडाला. औक्षण करण्यासाठी आलेल्या महिला या आगीत काही महिला जखमी झाल्या आहेत.
शिवाजी पाटलांकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पडलं आणि काल (२३ नोव्हेंबर) मतमोजणी करण्यात आली. यावेळी चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी २४,१३४ इतक्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या मतदारसंघात त्यांनी ८४,२५४ मतं मिळवली आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नागेश पाटील (६०,१२० मतं) व राष्ट्रवादीच्या (शरद पवार) नंदाताई बाभूळकर-कुपेकर (४७,२५९ मतं) यांचा पराभव केला आहे.
हे ही वाचा >> Mumbai Konkan Region Election Results 2024 Live Updates : शपथविधीची तारीख व ठिकाणही ठरलं, मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित जागेची निवड
महायुतीकडून मविआचा दारुण पराभव
मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३५ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३५ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ४९ जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.