ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्येतील मुख्य आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे यांना कोल्हापूर न्यायालयाने झटका दिलाय. आरोपी तावडे आणि अंदुरे यांनी खटल्यातून दोष मुक्तीसाठी केलेला अर्ज होता. मात्र, कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी सोमवारी (२५ एप्रिल) आरोपींचा हा अर्ज फेटाळून लावला.
कॉ. पानसरे प्रकरणात अन्वेषण यंत्रणेने नेमके हल्लेखोर कोण ते अगोदर निश्चित करावे, असा युक्तिवाद अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी गेल्या आठवड्यात केला होता. आरोपी तावडे, अंदुरे यांची निर्दोष मुक्तता करावी, या मागणीसाठी त्यांनी युक्तिवाद केला होता. आज सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी तावडे व अंदुरे यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. तसेच त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज नामंजूर करावा अशी मागणी केली.
हेही वाचा : परशुराम वाघमारेनेच केली गौरी लंकेश यांची हत्या, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर
आरोपींविरुद्ध पानसरे हत्या आणि केलेल्या नियोजन आराखड्याचा सरकार पक्षाकडे भक्कम पुरावा असल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर आरोपींच्या अर्जावर दोन्ही बाजूने सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपींचा अर्ज फेटाळून लावला.