Kolhapur Crime News: लग्न जुळविण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळाचा सर्रास वापर केला जातो. मात्र या माध्यमाची विश्वासाहर्ता वादात आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून आजवर अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र तरीही काही आरोपी या माध्यमातून महिलांची जबर फसवणूक करत आहेत. कोल्हापूरमध्ये असेच धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आले आहे. कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या एका घटस्फोटित महिलेला आरोपी फिरोज निजाम शेख (वय ४०) या पुण्यातील आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत फसवले. पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिच्याकडून ११ लाखांचा ऐवज आरोपीने लुटल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या कृत्याची माहिती सार्वजनिक केली आहे.
कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याचा छडा कसा लावला, याची माहिती दिली. तसेच आरोपीने आणखी काही महिलांची अशाप्रकारे फसवणूक केली असेल तर त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन पंडित यांनी केले.
नेमके प्रकरण काय आहे?
महेंद्र पंडित यांनी सांगितले की, पीडित महिलेला एक मुलगा असून त्या घटस्फोटित आहेत. पुन्हा लग्न करण्यासाठी त्यांनी एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर आपला प्रोफाइल टाकला होता. तिथे फिरोज शेख या आरोपीने प्रोफाइलला इंट्रेस्ट दाखवत एकेकांना मोबाइल नंबर दिला. पुढे त्यांचे बोलणे सुरू झाले. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान हा सर्व प्रकार घडला.
पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपी फिरोज शेखने कोल्हापूरला भेट देऊन पीडितेच्या कुटुंबियांशीही संवाद साधला होता. त्याच्याकडे पाच कंपन्यांची एजन्सी असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याची आर्थिक स्थिती चांगली असल्याचेही त्याने सांगितले. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीच्या आई-वडिलांबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांचे अपघाती निधन झाले असल्याचा बनाव आरोपीने रचला. त्याचबरोबर आपण अविवाहित असून एकटेच राहतो, असेही खोटे सांगितले.
पालकांचा लग्नास नकार, पण…
दरम्यान पीडितेच्या पालकांना आरोपी फिरोज शेखने दिलेल्या माहितीवर संशय आला होता. म्हणून त्यांनी लग्नासाठी फार काही प्रतिसाद दिला नाही. मात्र पीडिता आरोपीच्या संपर्कात राहिली. यानंतर आरोपीने पीडितेला विश्वासात घेऊन खोटी कारणे सांगून ११ तोळे सोन्याची दागिने आणि १ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. तसेच कोल्हापूर येथे लॉजवर बोलावून तिच्या इच्छेविरोधात शरीरसंबंध प्रस्थापित केले.
मात्र यानंतर त्याने पीडितेला भेटण्यास टाळाटाळ केली. तसेच याची वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने राजवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतले. आरोपीकडून १ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. मात्र दागिन्याचे त्याने काय केले, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नागरिकांना आवाहन केले की, ऑनलाईन संकेतस्थळाच्या माध्यमातून लग्न जमवत असताना खबरदारी घेतली पाहीजे. पालकांना विश्वासात घेऊनच लग्नाची बोलणी करायला हवी.