कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिकेचा नगरसेवक, माजी पाणीपुरवठा सभापती, कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडे याला शनिवारी (१ जानेवारी) स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पुणे येथे अटक केलं. मागील २ वर्षांपासून पोलीस त्याच्या शोधात होते.
संजय तेलनाडे आणि त्याचा नगरसेवक भाऊ सुनिल या दोघांनी ‘एस.टी. सरकार’ या नावाने संघटित गुन्हेगारी टोळी बनवली होती. तेलनाडे बंधूंच्या विरोधात वेगवेगळे १७ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही भावांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
२ वर्षांपासून संजय तेलनाडे फरार
आरोपी संजय तेलनाडे कारवाई टाळण्याच्या उद्देशाने मे २०१९ पासून फरारी होता. अखेर आज संजय तेलनाडे हा आंबेगाव (पुणे) येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला समजली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला इचलकरंजी शहापूर पोलीस ठाण्यांमध्ये हजर करण्यात आलं आहे.
पोलिसांना चकवा देत वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्काम
फरार झाल्यापासून आरोपी संजय तेलनाडे सातत्याने वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत होता. त्याने मोबाईल नंबर बदलून पोलिसांना अनेकदा चकवा दिला. अखेर गुंगारा देणाऱ्या तेलनाडे याला पकडण्यात पोलिसांना यश आलं.