लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बनली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना विजयी करण्यासाठी नगरसेवकांनी ही निवडणूक मुश्रीफ विरुद्ध मंडलिक आहे, असे समजून प्रचारात उतरावे, अशी सूचना कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना विश्रामगृहावर झालेल्या बैठकी वेळी केली.    
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची उमेदवारी धनंजय महाडिक यांना जाहीर झाली आहे. गतवेळी धनंजय महाडिक यांनी अपक्ष उमेदवार खासदार सदाशिवराव मंडलिक यांना सहकार्य केले होते. यावेळी खासदारपुत्र संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेतर्फे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाली आहे. यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि माझ्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. ते पुढे म्हणाले, निवडणुकीला धनंजय महाडिक नव्हे तर मुश्रीफ उभे राहिले आहेत. मुश्रीफ विरुद्ध मंडलिक अशी लढत आहे, असे समजून कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीत महाडिक यांना दगाफटका होऊ नये यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के.  पोवार म्हणाले, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व धनंजय महाडिक एकत्र येण्याची गरज असून यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. यावेळी महापौर सुनीता राऊत, गटनेते राजेश लाटकर, आदिल फरास, सचिन खेडकर यांच्यासह राष्ट्रवादीचे २७ नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.