कोल्हापूरमध्ये गोकुळच्या ६० व्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये जोरदार गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. बसण्यासाठी जागा नसल्याने आणि समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्याने शौमिका महाडिक सभेतून बाहेर पडल्या आणि समांतर सभा सुरु केली. यावेळी त्यांनी साध्या दूध उत्पादकांची फसवणूक करु नका असं आवाहन करत सत्ताधाऱ्यांनी दिलेली वचनं पाळली नाहीत असा आरोप केला. दरम्यान, सभा संपल्यानंतर सतेज पाटील, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील या तिन्ही आमदारांना सभासदांनी खांद्यावरून व्यासपीठावर नेलं.
गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे अध्यक्षीय भाषण सुरू झाले असता विरोधकांकडून व्यत्यय आणण्यात आला. विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली असता, त्याला सत्तारूढ गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. यामुळे एकीकडे अध्यक्ष पाटील यांचे भाषण आणि दुसरीकडे घोषणा-प्रतिघोषणा यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला.
गोकुळचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील हे सभासदांसमवेत बसले होते. गोकुळचे नेते सभामंच सोडून खाली बसण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने त्याची चर्चा रंगली. दरम्यान, समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी घोषणा देत सभास्थळ सोडलं. यानंतर शौमिका महाडिक यांनी समांतर सभा सुरु केली.
शौमिक महाडिक यांचे आरोप
प्रसारमाध्यमांशी बोलताना शौमिका महाडिक यांनी म्हटलं की “आमच्यासारख्या सर्वसामान्य विरोधकांनी अधिकारी भाषा कळत नाही. संचालकांना साध्या सोप्या शब्दात उत्तरं द्यावी इतकीच मागणी होती. राजकीय प्रश्न विचारलेले नसतानाही त्यांना उत्तर देणं कठीण पडत आहे. आमच्या डोळ्यात डोळे घालणंही त्यांना जड जात आहे. अहवाल वाचत असताना, प्रश्नांची उत्तरं देत असताना नजरही उचलली जात नाही. दूध उत्पादक खूप साधा असून, त्याला गुंडाळण्याचा प्रयत्न करु नका. उत्तरं देता येत नाही हे चेअरमन साहेबांनी मान्य करावं”.
चुकीच्या निर्णयावर पडदा टाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असून एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिलं नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली. तसंच कार्यकारी संचालकांनी स्वतःचे किती टँकर लावले आहेत याचा खुलासा करावा अशी मागणीही केली.