श्री महालक्ष्मीच्या खजिन्यात मार्च २०१८ अखेर ५१ किलो सोने जमा झाले असून त्याची किंमत १२ कोटी २१ लाख आहे. तर ९४५ किलो २७५ ग्रॅम चांदी जमा झाली असून त्याची किंमत ३ कोटी ८८ लाख इतकी आहे , अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, देवस्थानकडे भाविक लोक भक्ती भावाने सोने चांदीचे अलंकार अर्पण करत असतात. त्यामध्ये पाचुं, हिरे, खडे अशा स्वरुपातही अलंकार असतात. या अर्पण केलेल्या, नवसफेड केलेल्या दागिन्यांचे मूल्यांकन आर्थिक वर्ष संपल्यानंतर करण्यात येते. त्यानुसार दागिन्यांचे मूल्यांकन समितीच्या यादीवरील शासनमान्य सराफ पुरुषोत्तम काळे, योगेश कुलथे, उमेश पाठक यांनी दागिन्यांचे मूल्यांकन केले. यानंतर दागिन्यांच्या मूल्यांकनाची ही आकडेवारी हाती आली.
श्री महालक्ष्मी मंदिरातील दागिन्यांच्या बरोबरच देवस्थान समिती अखत्यारितील ४७१ मंदिरातील दागिन्यांचे मूल्यांकनही करण्यात आले. त्यानुसार या 471 मंदिरात २९ किलो १७१ ग्रॅम सोने जमा असून त्याची किंमत ३ कोटी ६ लाख रुपये इतकी आहे., त्याचप्रमाणे १०३ किलो चांदी जमा झाली असून त्याची किंमत २ कोटी२० लाख इतके त्याचे मूल्यांकन करण्यात आले.
बाराव्या शतकातील जुने दागिने महालक्ष्मीच्या खजिन्यात आहेत. पाच फण्यांचा नाग असणारा सोन्याचा किरीट, बोरमाळ, म्हाळुंग, गदा, पादुका, चंद्रहार, नथ असे कित्येक दागिने महालक्ष्मी खजिन्यात आहेत. पोलिसांच्या बंदोबस्तात न्याय आणि विधी खात्याच्या परवानगीने या दागिन्यांचे प्रदर्शन भरवण्याचा मनोदय अध्यक्ष जाधव यांनी व्यक्त केली.
श्री महालक्ष्मीच्या मूर्ती जीर्ण झाली आहे. या मूर्तीची आजची अवस्था , तिच्या कपाळावर नागाची प्रतिमा , मूर्तीची पुर्नतपासणीआदी मुद्दांवर समिती काम करणार आहे . मात्र यामध्ये चुकीचे काही होवू नये यासाठी अभ्यासक , भक्तांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेतले जातील असेही जाधव यांनी सांगितले.