कोल्हापूर महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वायफाय सिटी, सेफ सिटी (सुरक्षित शहर),  स्मार्ट सिटी अशा वैशिष्टय़पूर्ण कामांचा समावेश केला आहे. ताजमहलच्या धर्तीवर महालक्ष्मी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. स्थायी समितीचे सभापती आदिल फरास यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात १०९७ कोटी ९८ लाख रुपये जमेसाठी, तर १०३४ कोटी २ लाख रुपये खर्चासाठी धरण्यात आले आहे. पारदर्शक अर्थसंकल्प मांडण्याच्या पध्दतीला फाटा देवून आपल्या प्रभागाचे हित पाहण्याचा सभापती फरास यांच्या अपमतलबी प्रवृत्तीवर टीकेची झोड उठवत आणि कागदपत्रे सभागृहात भिरकावून निषेध नोंदवत भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. तर राष्ट्रवादीचे गटनेते रवी भास्कर यांनी विरोधकांचे दोन सदस्य स्थायी समितीत असून त्यांच्या मान्यतेनेच विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर झाल्याचे सांगितले. महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प अस्तित्वात येण्यासाठी प्रशासनाची साथ महत्त्वपूर्ण आहे, असा सूर सर्व सदस्यांनी सभेत लावला होता.
गेल्या आठवडय़ामध्ये आयुक्त पी. शिवशंकर यांनी बनवलेला अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सुपूर्द केला होता. तर सोमवारी चाललेल्या महापालिकेच्या सभेत फरास यांनी अर्थसंकल्प सभागृहाकडे सादर केला. सभेसाठी महापौर तृप्ती माळवी या सभागृहात आल्या तेव्हा त्यांच्यावर बहिष्कार घालण्याची भूमिका कायम ठेवत नगरसेवकांनी उठून उभे राहून मानवंदना देण्याचे नाकारले. स्थायी समिती सभापती फरास हे अर्थसंकल्पाची प्रत देण्यासाठी महापौर माळवी यांच्याकडे गेले तेव्हा महापौरांनी उभे राहण्याचे टाळून उट्टे काढले. अन्य लोकांनी त्यांचा महापौर मॅडम असा उल्लेख केल्यानंतर आणि नमूद केल्याची भूमिका घेतल्यावर माळवी व आयुकत पी. शिवशंकर यांनी अर्थसंकल्पाची प्रत स्वीकारली.
त्यानंतर फरास यांनी सन १४-१५ सालचे सुधारित व सन १५-१६ सालचे नवीन अंदाजपत्रक सादर केले. सध्याच्या इंटरनेट युगाची चाहूल घेत अर्थसंकल्पात शहर वायफाय करण्याचा आणि त्यासाठी सव्वा दोन कोटीची तरतूद करण्याचा निर्णय स्वागतार्ह ठरला. शहर सुरक्षित बनविण्यासाठी सेफ सिटी प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेचे चार कोटी व पोलिसांचे एक कोटी रुपये खर्च होणार असून शहरातील प्रमुख चौकात, रस्त्यावर धार्मिक स्थळे येथे सिसिटीव्ही बसविण्यात येणार आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या शिरोली पुलाजवळ उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोर बहुमजली वाहनतळ उभे करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सर्व शहरांमध्ये एलईडी प्रकल्प राबविण्यास प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबले असून करवीर नगरीत सुमारे दहा हजार एलईडी लाईट बसविले जाणार आहेत. त्यासाठी पंचवीस लाखाची तरतूद करण्यात आली आहे. पंचगंगा नदीतील दूषित पाण्याची तीव्रता लक्षात घेवून दुधाळी आल्यावर पंचवीस दशलक्ष लिटरच्या एचटीपी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. महापालिकेतील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेची बससेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर एटीएम मशिनच्या धर्तीवर मध्यवर्ती ठिकाणी मिनरल वॉटर सुरू केले जाणार असून एक रुपयामध्ये एक लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी आकर्षक रोषणाईचे काम नामवंत कंपनीकडून केले जाणार आहे. मराठा समाजासाठी मराठा भवन बांधले जाणार असून २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ पुरोगामी नेते कै.पानसरे व सदाशिवराव मंडलिक यांचे स्मारक उभे करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
सत्तारुढ गटाचे राजू लाटकर, प्रा. जयंत पाटील, भूपाल शेटे आदींनी अर्थसंकल्पातील तरतुदीचे स्वागत केले. विरोधी सदस्यांनी मात्र अर्थसंकल्प विकासशून्य असल्याची टीका करून आदिल फरास यांनी आपल्याच भागात एलईडी सिटी १२ इमाम अंतर्गत रस्ते १५ लाख, विकासकामे ५ लाख, िबदू चौक १० लाख असा मोठा निधी वळवल्याबद्दल टीका केली. राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेऊन कारभार केला जात असताना त्यांच्या स्मारकासाठी अत्यल्प तरतूद केल्याबद्दल महेश कदम यांनी निषेध नोंदवला. आर.डी.पाटील यांनीही अर्थसंकल्पातील अयोग्य बाबींचा उल्लेख करून टीकेची झोड उठविली. तर सभेच्या प्रारंभी निशिकांत मेटे यांनी महापालिकेच्या हद्दवाढीला राज्य शासनाने कचऱ्याची टोपली दाखवल्याबद्दल सभागृहात कागदे भिरकावून निषेध नोंदवला. या मुद्दयावर नेत्यांनी सभात्याग केल्यावर विरोध पक्ष नेते मुरलीधर जाधव यांनी त्याला जनसुराज्य शक्ती पक्षचा पािठबा असल्याचे सांगितले.