लाचखोरीचा ठपका लागलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते राजू लाटकर यांनी पक्षाच्या सर्व २७ नगरसेवकांची बैठक बुधवारी आयोजित केली होती. त्यामध्ये माळवी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा आणि त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लाचखोरीच्या एका प्रकरणामध्ये महापौर तृप्ती माळवी रंगेहात पकडल्या गेल्या. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा मुद्दा पुढे आला. अशातच मुदत संपूनही माळवी यांनी महापौर पदाचा राजीनामा न दिल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची खप्पामर्जी झाली. या साऱ्याचा परिणाम म्हणून माळवी यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय गेल्या सोमवारी घेण्याची ठरले होते. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी पक्षाच्या काही नगरसेवकांची चर्चाही केली होती. सोमवारी सायंकाळी याबाबतचा निर्णय अपेक्षित असतानाच पक्षात वेगळीच सूत्रे फिरली. माळवी यांची थेट हकालपट्टी करण्याची प्रक्रिया चुकीची ठरेल हे लक्षात आल्यानंतर रीतसर प्रक्रिया करण्याची पक्षाने ठरविले. त्यानुसार लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.

Story img Loader