लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांनी सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सभेमध्ये विरोधकांनी घोषणाबाजी केली. विरोधकांनी त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली. मात्र, त्याला महापौरांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
माळवी यांनी सोमवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. सभेमध्ये त्या महापौरपदाचा राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी सभा संपेपर्यंत राजीनामा दिला नाही. सभा संपल्यावर त्या महापौरांच्या दालनात निघून गेल्या.
राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी माळवी यांना महापौरपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे याआधीच स्पष्ट केले आहे. जागेच्या आरक्षणामध्ये फेरफार करण्यासाठी १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल माळवी व त्यांचा स्वीय सहायक यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणात अटक होऊ नये, यासाठी माळवी यांचे गेले चारपाच दिवस वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू होते. सर्व प्रयत्न खुंटल्यानंतर अखेर गेल्या गुरुवारी त्या स्वतहून लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे हजर झाल्या. दुपारी न्यायालयाच्या आदेशानुसार माळवी यांना अटक करण्यात आली नंतर वैयक्तिक जामिनावर मुक्तताही करण्यात आली.

Story img Loader