लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : आजपर्यंत कोट्यवधी प्रवाशांना अंगाखाद्यावरून नेणाऱ्या कोल्हापूर-मिरज लोहमार्गाला आज १३४ वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून लोहमार्गाच्या उभारणीसाठी सरकारी खजिन्यातून २२ लाख ९९ हजारांची मदत देणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मिरज रेल्वे स्थानकावर अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी भाजप नेते व रेल्वे क्षेत्रीय सदस्य श्री. रोहित चिवटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

या वेळी श्री. चिवटे म्हणाले, ‘२ मे १८८८ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला. लगेच दुसऱ्या दिवशी ३ मे १८८८ रोजी त्यांनी कोल्हापूर- मिरज लोहमार्गाची पायाभरणी केली. हा संपूर्ण खर्च २२ लाख ९९ हजार इतका आला. हा सर्व खर्च कोल्हापूर संस्थानाच्या वतीने करण्यात आला होता. तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करून २१ एप्रिल १८९१ रोजी या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते.

या मार्गामुळे, तसेच मिरज रेल्वे जंक्शन झाल्यामुळे आज मिरजमधून काश्मीर ते कन्याकुमारी व कच्छ ते बंगालपर्यंत मिरज शहर रेल्वे मार्गामुळे संपूर्ण देशाशी जोडले गेले आहे. या जंक्शनमुळे मिरजच्या व्यवसायवृद्धीसाठी विशेषत: संगीतातील तालवाद्य, तंतुवाद्य या उपकरणासाठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मोठी मदत झाली आहे. तसेच, मिरज आरोग्य पंढरी म्हणून नावारूपास येण्यासाठी मिरज जंक्शनचा बहुमोल वाटा आहे.

या वेळी स्टेशन प्रबंधक जे. आर. तांदळे, वाणिज्य निरीक्षक श्री. जॉन, मुख्य तिकीट निरीक्षक पी. बी. मराठे, सहायक मंडळ अभियंता सरोजकुमार, मुख्य निरीक्षक (विद्युत) अक्षय टेंबरे, सुनील कुलकर्णी, श्रीमती शारदा माळी, श्रीमती संगीता बागणे, राजश्री कोरे, यमुना चिकोडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.