महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.
कोल्हापूरात पोटनिवडणुक कार्यक्रम प्रक्रिया सुरू झाली आहे. जयश्री जाधव यांना बिनविरोध करण्याची मागणी पालकमंत्री पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. तर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली होती. तथापि महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार ज्या पक्षाकडे मतदारसंघ आहे; तेथे त्या पक्षाला आघाडीची उमेदवारी द्यायची, असा धोरणात्मक निर्णय झाला आहे.
त्यानुसार हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील व शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी शुक्रवारी सांगितले. यापूर्वी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, पालकमंत्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना देण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.